सोनी टिव्ही !

साधारण दोन वर्षांपूर्वी म्हणजे एप्रिल व मे २००९ मध्ये मी जोशीज् कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (चिंचवड शाखा) येथे अभ्यास पुस्तिकांच्या लिखाणाचे काम करीत होतो. ह्या पुस्तिकांच्या लिखाणासोबत त्यांची संगणकावरील अक्षरजुळणी ही मीच करीत असे. या कामाकरिता आवश्यक असणारे Desk Top Publishing चे प्रशिक्षण अगदी सकाळी उरकून मग मी तसाच JKTI मधील माझ्या कामावर रूजु होत असे. त्यानंतर सायंकाळच्या वेळेत माझ्या घरापासून जवळच मी ७ वी, ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेत असे. हे सगळे उद्योग आटोपून जेवण होईस्तोवर रात्री बराच उशीर होई. थकलेल्या मनाला विरंगुळा म्हणून जेवताना सोनी टीवीवरून प्रसारित होणारी भास्कर भारती ही मालिका मी नियमित बघत असे. विनोदी धाटणीची ही मालिका बघण्याची मला गोडी लागली. दुसर्‍या दिवशी लवकर उठून दिनचर्येला सुरूवात करावयाची असल्याने इतर कुठलीही मालिका बघायला वेळ मिळत नसे.

अशातच जून २००९ मध्ये बेळगाव स्थित स्टारलाईन मोटर्स इंडस्ट्रीज या कारखान्यात काम करण्याची एक मोठी संधी चालून आली. इथे तीन ठिकाणी यातायात करून जितके उत्पन्न हाती पडत होते, त्याहून जवळपास दुप्पट उत्पन्न बेळगावात एकाच ठिकाणी काम करून मिळणार असल्याने जून महिन्यात मी स्टारलाईनमध्ये रूजु झालो. इथे कारखान्याच्या आवारातच मालक श्री. दिलीप चोपडा आपल्या वृद्ध मातोश्रींसह राहत होते. त्यांच्या बाजूच्या खोलीतच माझी राहण्याची सोय केली गेली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या भोजनालयातच माझ्या जेवणाचीही सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. पहिल्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यावर त्यांनी मला सांगितले की ते स्वत: जरी पाहत नसले तरी त्यांचे येथे टीवी देखील उपलब्ध आहे व मला हवे असल्यास मी त्यावर माझ्या आवडीचे कार्यक्रम रात्री साडेदहा पर्यंत पाहू शकतो. (त्यानंतर सर्वांनाच विश्रांतीची गरज असल्याने टीवी बंद ठेवणे ओघाने आलेच).

श्री. चोपडा स्वत: टीवी पाहत नसल्याने केबलवरील वाहिन्यांची माहिती करून घ्यावी म्हणून मी त्यासंबंधी चोपडांच्या मातोश्रींची पूर्णवेळ देखभाल करणार्‍या परिचारिकेला विचारले की सोनी टीवी आहे का? त्यावर तिने होकारार्थी उत्तर दिले. तेव्हा मी टीवी चालू करून रिमोटच्या मदतीने एकामागोमाग चॅनेल्स बदलु लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की या टीवीला दूरदर्शनचा फ्री चॅनेल वाला डीटीएच जोडला असून त्यावर केवळ काही ठराविक मोफत वाहिन्यांचेच प्रसारण होत होते आणि त्यात अर्थातच सोनी टीवीचा समावेश नव्हता.

परिचारिकेला टीवीजवळ बोलावून रिमोटने चॅनेल बदलतच मी पुन्हा विचारले, “तुमने तो कहां था सोनी टीवी है। मुझे तो कही नही दिख रहा है।” त्यावर ती उत्तरली, “मुझे तो साफ दिख रहा है।” मी आश्चर्याने उद्गारलो, “कहां है?” तिने अंगुलीनिर्देश करीत सांगितले, “यह क्या, यही तो है सोनी टीवी।”

तिने बोट दाखविले त्या दिशेने मी पाहिले आणि एकदम हतबुद्धच झालो. त्या टीवीच्या मॅन्यूफॅक्चरींग कंपनीचे सोनी हे नाव ठळक अक्षरात दर्शनी भागावर लिहीले होते.


लेखक: चेतन गुगळे

२ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

हा हा ... सोनी मिळाला ना मग :)

देवदत्त म्हणाले...

म्हणूनच ते नेहमी म्हणत असतील " आप देख रहे हैं सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन" :)