जरा कल्पना करा....

सध्या माझ्या घराजवळच असलेल्या एका खासगी शिकवणी वर्गात महिनाभराकरिता रोज दोन तास (आठवी मराठी माध्यमाला गणित आणि सातवी इंग्रजी माध्यमाला इंटेलिजिन्स टेस्ट (बुद्धिमता चाचणी)  या प्रमाणे विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरू आहे.  आठवीच्या विद्यार्थ्यांकडून योग्य ते सहकार्य मिळत आहे पण सातवीच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरूच असतो.  परीक्षा २७ मार्चला आहे पण अजूनही वर्गात प्रचंड प्रमाणात दंगा सुरू असतो.  कोणाच्याही आटोक्यात न येणार्‍या या विद्यार्थ्यांना शिकविण्याचं काम एक आव्हान म्हणून मुद्दामच मी स्वीकारलं आहे.


काल असाच नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना कसाबसा शांत करून फळ्यावर एक उदाहरण सोडवून देत होतो.  इतक्यात मागून मयूरचा आवाज आला, "एSS पाटल्या...."
मी लगेच गर्रकन वळलो आणि मयूरला फैलावर घ्यायला सुरूवात केली.
मी : मयूर, हे तू काय बोलतोयस?
मयूर : काही नाही सर, त्याला हाक मारतोय.
मी : अशी?  त्याचं नाव काय?
मयूर : पाटील.
मी : मग तू काय म्हंटलास?
मयूर : पाटल्या
मी : हे शोभतं का? असं बोलतात का?
मयूर : का सर?  यात काय चूकलं? वर्गात सगळे असंच बोलतात.

आपलं काही चूकलंय हेच त्याला कळत नव्हतं.  गंमत म्हणजे ज्या पाटील नावाच्या मुलाला तो असं बोलत होता त्यालाही राग आला नव्हता.  आता या मुलांना न रागावता प्रेमाने ही गोष्ट कशी समजवावी याचा मी विचार करू लागलो.  बाल मानसशास्त्र (चाईल्ड सायकॉलॉजी) मदतीला धावून आले.

मी : मयूर तुझं वय किती?
मयूर : तेरा
मी : आणि त्या पाटीलचं ही तेवढंच नाहीका?
मयूर : हो.
मी : आता तू त्याला असं "पाटल्या" म्हणतोयस आणि तुला त्यात काहीच चूक वाटत नाहीये? पण अशी कल्पना कर.. जस्ट इमॅजिन हं.. म्हणजे तुझे वडील आणि त्या पाटीलचे वडील एकमेकांना भेटलेयत आणि तुझे वडील त्यांना म्हणतायत "एSS पाटल्या...."  कसं वाटेल ऐकायला?

यावर आधी सारे विद्यार्थी आधी चकित झाले, नंतर माफक हसले आणि मग हे असं बोलणं चूकीचं असं सगळ्यांनाच वाटू लागलं.  मयूर ही लगेच "सॉरी सर" म्हणून मोकळा झाला.

सार्‍या वर्गावरून विजयी मुद्रेने एक नजर फिरवून मी पुन्हा फळ्यावर उदाहरण सोडवू लागलो.  मिनीटभरात प्रतीकचा आवाज आला, "सर हा श्रेयस मला जाड्या म्हणतोय"

"काय?"  मी आश्चर्यातिरेकाने पुन्हा विद्यार्थ्यांकडे बघत म्हणालो, "स्वत:च जाडजूड असलेला हा श्रेयस ह्या काटकुळ्या प्रतीकला जाड्या कसा काय म्हणतोय?"

तेव्हा प्रतीक उद्गारला, "त्या अर्थाने नाही हो सर! माझं आडनाव जाधव आहेना म्हणून..."

"काय रे श्रेयस? खरंय का हे?" मी विचारले.

"म्हणजे सर मी प्रतीकला तसं म्हणत नव्हतो काही.. फक्त मगाशी तुम्ही मयूरला इमॅजिन करायला सांगितले ना, तसंच मी देखील जस्ट इमॅजिन करतोय की समजा माझे बाबा या प्रतीक जाधवच्या वडिलांना भेटलेत आणि म्हणतायत "ए जाड्या" तर कसं वाटेल?"  श्रेयस उत्तरला.

त्याच्या ह्या कल्पनेने प्रेरित होऊन सारा वर्गच अशा कल्पनाविश्वात रमला आणि प्रत्येकजणच आपल्या शेजारच्या विद्यार्थ्याचे आडनाव अपभ्रंशरूपात उच्चारू लागला.

जस्ट इमॅजिन्... माझी काय अवस्था झाली असेल?

लेखक: चेतन गुगळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: