अनुदिनी चोरास !!

कशास निराशेचे नभ हे दाटले तुजसमोरी ?
लेख न लिहिता आला ,शोक कशास करी ?
गरजच काय लेख लिहिण्याची शिष्या ,
तुटवडा नाही जालावर सुंदर लेखांचा…

ऐक कान देऊनी सांगतो तुज रहस्य एक,
जरा जालावर अपुली शर्विलक- नजर फेक,
इतरांचे लेख खपवणे अपुल्या नावाने,
हा उपाय आहे सहजसाध्य विनाकष्टाचा ,

अनुदिनींवर भिरभिरती नजर असावी ,
अपुली एका अनुदिनी परि असावी,
आणिक असावा व्यासंग दांडगा जालाचा,
लेख इतरांचे ,गजर करावा स्वनामाचा …

होताच आरोप चोरीचा ,स्वीकार तया करू नये,
आरडाओरडा होईल खरा, उत्साह परि मरू नये,
अपुलीच री ओढावी, वा अनुदिनी अजून एक बनवावी ,
नित्य-नवा करावा त्यावरी ,संग्रह चौर्य -साहित्याचा…

कुणी म्हणताच चोरी ही, आपण करावी कुरघोडी,
सहज उपलब्ध लेख हा , मी कसा तया सोडी ?
जालावरचे साहित्य हे, कुणी न अपुला हक्क सांगावा,
हवा तसा वापरेन ,लेख ना तुझ्या बापाचा …

हल्ला करताच टोळ्यांनी ,धीर न जरा सोडावा,
नाव बदलूनी अपुले , परत कार्यकारण साधावा,
अनुदिनी बनवाव्यात बर्‍याच ,मोफत सुविधा ही,
परि न थांबवावा क्षणभर, धंदा लेख चोरण्याचा…

दिवसेंदिवस असाच उद्योग करशील जेव्हा ,
निर्लज्जतेची गोळी तू खाशील जेव्हा..
हे माझ्या शर्विलक शिष्या , आशीर्वाद देतो,
तेव्हा राजा बनशील तू ,अनुदिनी-चोरांचा …

कवी: संकेत पारधी