सोनू उभा राहिला,आम्ही नाही पाहिला! असं म्हणता म्हणता त्याचा कॉनव्होकेशन समारंभ पार पडला. हो,त्या कॉनव्होकेशन समारंभाची गंमत म्हणजे तो ग्रॅज्युएशनचा नाही बरं का! तर प्री-प्रायमरीतून प्रायमरीत गेल्याबद्दलचे फंक्शन. मजा आहे ना, आमचं ग्रॅज्युएशन काय,चांगलं डबल ग्रॅज्युएशन होऊनही या कॉनव्होकेशन श्ब्दाकडेही वळलो नाही. कारण ते एकतर कंपल्सरी नसतं आणि तो ड्रेस भाड्याने घ्या,युनिव्हर्सिटीच्या तारीख आणि वेळेनुसार तिथे हजर व्हा, हे कोणी सांगितलंय? म्हणून ते डोक्यावर शानदार कॅप, अंगात काळा कोट आणि हातात सर्टिफिकेटची सुरनळी अशी ऐटदार छबी पाहण्याचे स्वप्न होतं ते अपुरंच राहीलं. मात्र सोनूची शाळा एकदम पॉश. त्यांच्या कल्पनाही आधुनिक आणि नवनव्या. त्यामुळे त्यांच्या शाळेत तो सिनिअर केजीतून फर्स्ट स्टॅंडर्डला गेला तरी पदवीदान समारंभ होता. त्यामुळे त्यांचं फंक्शन अगदी एप्रिल महिना पूर्ण गाजत होतं. एकेका बॅचचे एकेका स्टुडंटचे तो ड्रेस घालून फोटो. मग एक दिवशी त्यांना सुंदर एनव्हलपमध्ये पालकांसाठी invitation card दिलं. त्यावर लिहिलं होतं श्री व सौ; पण आतमध्ये मात्र लिहिलं होतं only one person allowed.
सोनू रोज घरी आल्यावर सांगायचा, "आजी,आमचे प्रेसिडेंट हॉलमध्ये येणार तेव्हा मग टीचर काय तरी बोलणार व आम्ही मान लववून येस मॅम,वुई डू असं म्हणायचं!"
हे अगदी त्यांच्याकडून आठ-दहा दिवस रटवून घेतलं आणि तो दिवस उजाडला; पण खरंच,फंक्शन अगदी सुरेख झालं. मुलांनीच सार्या कार्यक्रमाचं संचालन केलं,निवेदन केलं. मुलांचीच मोजकी गाणी आणि नृत्ये. खरंच एवढ्या नन्हे-मुन्हे मुलांकडून इतकं सुंदर काम करून घ्यायचं म्हणजे ती मुलं जितकी हुशार तितकीच त्या टीचर्सचीही कमाल आहे. सगळी मुलं त्या कॅप आणि ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसत होती. त्या ड्रेसमध्ये सोनूला पाहून माझं स्वप्नं अपुरं राहिल्याची खंत कुठच्या कुठे पळून गेली. तर सांगायचं म्हणजे तो समारंभ पार पडला आणि समर व्हेकेशन सुरु झालं.
पूर्वी उन्हाळ्याची सूट्टी म्हणजे कसं छान असायचं. सुट्टी पडायच्या आधीच आजी-आजोबांची,मामा-मामीची ’गावी मुलांना घेऊन या’ अशी अगत्याची पत्रे आलेली असत.अर्थात या पत्रांची जरूरही नसायची. कारण सुट्टी आणि आजोळ हेच समीकरण त्यावेळी असायचं. गावी गेलं की हवे तेवढे आंबे,फणस,काजू खा. आई-बाबांचा काच मुलांना नसायचा की वेळ जात नाही म्हणून मुलांची भुणभुण आई-बाबांच्या मागे नसायची. बायकांना सुखाचं माहेरपण आणि मुलांना प्रेमळ आजोळ लाभायचं. मोठे मामा,छोटे मामा नदीत डुंबायला ,विहीरीत पोहायला शिकवायचे,पतंग उडवायला शिकवायचे. मुली असल्या तर सागरगोटे,भातुकली,टिकरी असे खेळ खेळायच्या. तर उन्हाच्या वेळी सारीपाट,पत्ते,कॅरम असे बैठे खेळ असायचे.रानातल्या झुल्यावर,वडांच्या पारंब्यांवर सूरपारंब्या खेळल्या जायच्या. घरातल्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसून अंताक्षरी खेळली जायची. संध्याकाळी देवापुढे समईच्या प्रकाशात शुभंकरोती,मनाचे श्लोक,वेगवेगळ्या आरत्या म्हटल्या जायच्या. जेवून अंगणात पडलं की कोणी गमतीने भुताखेताच्या गोष्टी सांगे तेव्हा आजी ओरडायची, काहीतरीच काय रे सांगता मुलांना उगीच? शहरातली ही मुलं घाबरली तर नसती पंचाईत . आणि मग ती आपल्या रसाळ भाषेत रामायण-महाभारतातल्या, इसापनीती आणि कसल्या कसल्या गोष्टी सांगे. ऐकता ऐकता आम्हाला झोप कधी लागायची हेही कळत नसे.
कधीतरी काही शिदोरी घेऊन शेतावर,रानावनात हिंडायला जात होतो. झाडाझुडपांची,पक्ष्यांची,प्राण्यांची माहिती व्हायची, निसर्गाशी मैत्री व्हायची. आवळे,चिंचा,बोरं हा रानमेवा आवडीने खाल्ला जायचा. पिझ्झा,बर्गर,भेळ यांचे स्टॉल्स नसायचे.क्वालिटीसारख्या आईसस्क्रीमची पार्लर्स नसायची पण निरसं दूध मिळायचं. थंडगार शहाळी,रसबाळी केळी,ताडगोळे,बोरं ,करवंदांचा रानमेवा अशा अनेक गोष्टींची लयलूट असायची ज्यामुळे मन आणि जिव्हा तृप्त होत. मे महिना कधी संपे ते कळायचंही नाही. आता मात्र हजारो रुपये घेऊन निसर्ग शिबिरांतून निसर्गाची ओळख घडवून आणतात. खेड्यातील कृत्रिम वातावरण निर्माण करून आधुनिक राहणीची महागडी हॉलिडे रिसॉर्टस् बांधली गेली आहेत. इथे आपले खिसे खाली होत असतात. टिप्सच्या आशेने सेवा करणारे सेवक आपला अहंकार फुलवत असतात.