न्यूज रूम!

कृष्णकांत यांचा अब तक न्यूज़ चॅनेलमध्ये पहिला दिवस. आपल्या वरिष्ठ सभासदांशी ओळख आणि चॅनेलचा टीआरपी कसा वाढवावा याबद्दल एक चर्चा करायची असं त्यांनी ठरवलं होतं. सगळेच गडबडीत होते त्यामुळे आजच नवीन बॉस आला आणि लगेच अशी मोठी मीटिंग म्हटल्यावर सगळेच चिंतातुर झाले. बॉसला वॉशरूममध्ये यथेच्छ शिव्या घालून, टाय, इस्त्रीचा शर्ट सावरून सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले.


सगळ्यांची ओळख झाली, इतर न्यूज़ चॅनेल्स आणि अब-तकची आकडेवारी प्रोजेक्टरवर दाखवली गेली. चॅनेलचे बोर्ड ऑफ डाइरेक्टर्स बॉस मंडळी टीवी कॉन्फरन्सद्वारे मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. सगळ्यांचा चेहरा विचारात पडला होता, काय करावं सुचत नव्हतं. इतकी चांगली बातमी गोळा करून, ती सगळ्यात आधी जनतेला देऊन सुद्धा बाकी चॅनेल्स टीआरपीमध्ये अब-तकला मात देत होती. त्यांनी आपली ही चिंता आपल्या सहकार्‍यांपुढे बोलून दाखवली . काय करावं की सगळे आपलं चॅनेल जास्तीत जास्त बघतील? मला तुम्ही काही सूचना सुचवा. सगळे एकमेकांकडे बघायला लागले.

त्यातलाच एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला, “सर आपण न्यूज़पेक्षा अजून काही वेगळं द्यायला हवं. म्हणजे काही विशेष बातम्या द्यायला हव्या. नवनवीन कार्यक्रम आले की आपल्याला जाहिरातदार मिळतील तसेच वेगळे कार्यक्रम दाखवले म्हणून प्रेक्षकसुद्धा आकर्षित होतील.

कृष्णकांत – (विचित्र नजरेने) म्हणजे नक्की कुठले कार्यक्रम? आपण बातम्या पोचवतो आणि तेच आपलं काम!

तो – अहो सर, त्याच त्या बातम्या बघून प्रेक्षक हैराण होतात. त्यांना काही बदल लागतो. आपण २४ तास बातम्या देत राहणार तर आपण मागेच राहणार. आपल्याला नवनवीन कार्यक्रम ह्या बातम्यांच्या मध्ये घालायला हवेत. काही तरी चटपटीत बघायला लोकांना नक्कीच आवडतं.

कृष्णकांत – कुठले कार्यक्रम?

तो – सोप्पय! चित्रपटांचे परीक्षण, लोकांचं भविष्य, पेज-थ्रीच्या आतल्या गप्पा, टीवीमधल्या मालिकांचं विश्लेषण, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत, तीर्थक्षेत्राचा महिमा सांगणे, खेळाबद्दल विशेष माहिती, किंवा चार पाच यू-ट्यूबवरचे वीडियो घेऊन परत परत दाखवत राहायचे. तसेच काही पाककृतींचे कार्यक्रमही  अर्ध्या अर्ध्या तासाचे भाग असे आपण दर तासाला दाखवू शकतो.

कृष्णकांत – ह्म्म्म्म, ह्या गोष्टी मला अवांतर वाटतात. अजिबात गरजेच्या नाहीत. लोक बातम्या बघायला आपल्याकडे येणार आणि आपण असा मसाला त्यांना देणार. नाही हे चूक आहे.

तो – हं, बरोब्बर. पण आपण धंदा करतोय. आपल्याला स्पर्धेत राहायला असं काही तरी करायलाच हवं. आपण एक एक तासाचे विशेष भाग दाखवू. इतके दहशतवादी हल्ले झालेत आपल्या देशात. आठवड्याला एक असा एक हल्ला आणि त्याचं विश्लेषण करून घेऊ किंवा देवांवर आधारित कार्यक्रम दाखवू, स्वर्गाच्या पायर्‍या, सीताहरण कस झालं हे सांगू, किंवा एखाद्या सुपरस्टारचं लग्न होऊन सहा महिने झाले तरी ते तसे जवळ आले नाही.. अशी बातमी दाखवू. त्यात त्या सुपरस्टारला पब्लिसिटी मिळते आणि आपल्याला धंदा, किंवा राजकारणातला भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा विषय, जो आपल्याला पैसे देईल त्याच्या विरोधकांवर तुटून पडायचं..