फणा !

(कुसुमाग्रजांची माझी अत्यंत आवडती अशी 'कणा' ही कविता. तिचं विडंबन करायची माझी खरेतर लायकी नाही, पण तरीही सर्वांचीच माफी मागून हे मी केलेलं फुटकळ विडंबन सादर करतोय. एकेकाळी मी क्रिकेट बघणं सोडून दिलेलं असूनही ह्या वर्ल्डकपला मी फसलो आणि पुन्हा मनस्ताप करून घेतलाय. त्याचाच वैताग ह्यातून बाहेर पडलाय. पुन्हा एकदा कुसुमाग्रजांची अन 'कणा' ह्या कवितेवर अन कुसुमाग्रजांवर प्रेम करणार्‍या सर्वांची मी माफी मागतो.)

माझ्या विडंबन कवितेचं नाव - फणा

(प्रसंग - दक्षिण आफ्रिकेनं केलेल्या पराभवानंतर धोनी सचिनकडे येतो.)

ओळखलंत का सर मला, पावसात आला धोनी
कपडे होते व्हर्साचेचे, अन गॉगल अरमानी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
आयपीएलमुळे दमणूक झाली, प्रॅक्टीस गेली राहून

जाहिरातींच्या चित्रिकरणात ताकद खर्ची घातली
मोकळ्या वेळात शॉपिंग केली थोडी परदेशातली

पोरासोरांनी अन साहेबानं बॉलर्सचं श्राद्ध घातलं
प्रसाद म्हणून आफ्रिकेनं झोळीत पराभवाचं दान टाकलं

कागदी वाघांना घेऊन संगे सर आता लढतो आहे
कधी बॅटिंग पॉवरप्लेत, तर कधी स्लॉगमध्ये पडतो आहे

बॉलिंग मागायला हात पुढे करताच हसत हसत उठला
बॉलिंग नका करू सर जरा एकटेपणा वाटला

गेला असला वर्ल्ड कप तरी पैसा मिळतोय पुरा
पुढच्या वर्ल्ड कपला पोरासोबत खेळाल एव्हढाच 'वादा' करा!

(पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो! विडंबनासाठीही अन पकवल्यासाठीही!)

कवी: विद्याधर भिसे!

मूळ कविता - कणा
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

- कुसुमाग्रज

४ टिप्पण्या:

jyo म्हणाले...

छान झालय विडंबन....

Suhas Diwakar Zele म्हणाले...

हा हा हा ..भाई एकदम मस्त :)

आनंद पत्रे म्हणाले...

जबराट जमलंय

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

झकास्स रे भावा :)