श्री. देवांना समाजकार्य करायची हौस फार ! समाजकार्य करायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे पत्रकारिता करणे असा त्यांचा दृढ समज झाल्यामुळे ते त्यांचा कॅमेरा गळ्यात अडकवून सगळीकडे मिरवायची हौस पुरवून घेत असतात. त्यासाठी त्यांनी एक बनावट वर्तमानपत्राचा खास बनावट बिल्ला एका बनावट छापखान्यात छापून घेतला आहे. हा बिल्ला आणि त्यांचा कॅमेरा वापरून त्यांनी अनेक सभा, कार्यक्रमाचे वृत्तांत तयार केले व विविध वर्तमानपत्रांना व मासिकांना पाठवले, पण छे ! कोळशाच्या खाणीत जोपर्यंत हिरा असतो तोपर्यंत तो कोळसाच असतो हेच खरे. पण त्यांनी नुकताच एका धर्ममार्तंडाच्या सभेचा वृत्तांत लिहिला आणि त्या कोळशाचा हिरा झाला. तो चक्क एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात छापून आला आणि त्यांच्या या वृत्तांतावर वाचकांच्या उड्या पडल्या. प्रतिक्रियांचे तर विचारूच नका. शेवटी..त्यांचा सर्व्हर ढपला.
तो हा वृत्तांत –
आम्हाला सोनेरी रंगाचे एक पेय प्राणाहूनही प्रिय. बरोबर त्याचे नाव बिअर ! आता थोरामोठ्यांचे अनुकरण करावे या आपल्या समाजाच्या अत्यंत वंदनीय अशा नियमाप्रमाणे आम्ही गळ्यात कॅमेर्याच्या बरोबर रुद्राक्षाच्या माळा व तोंडात बिअरचे कौतुक अशा अवस्थेत हिंडत असतो हेही खरेच. आमच्या हातातही आम्ही तसल्या माळा घातल्या होत्या पण एका भगव्या झेंड्याखाली उभ्या असलेल्या सज्जन माणसाने आम्हाला त्या माळांबरोबर येणार्या जबाबदार्या सांगितल्याबरोबर आम्ही त्या काढून त्यांच्या स्वाधीन केल्या. गळ्यात माळ घालणे व हातात माळा घालणे याच्यातला फरक त्या दिवशी आम्हाला चांगल्याच प्रकारे समजावून सांगण्यात आला. असो. त्यांच्या हातापाया पडून आम्ही आमचा कॅमेरा कसाबसा मिळवला आणि आम्हीही त्याच दिवशी भीष्मप्रतिज्ञा करून टाकली “ आयुष्यात कधीही गळ्यात माळ घालणार नाही. पण एक दिवस हातात माळा घालणार!”
या आमच्या भीष्मप्रतिज्ञेमुळेच आम्ही त्या सभेचा वृत्तांत लिहू शकलो. आम्ही हातात त्या माळा घालू शकलो का नाही हे आपल्याला यथावकाश कळेलच.
या प्रतिज्ञेचे आम्ही लगेचच टी-शर्ट करून घेतले आणि ते घालून वावरू लागलो. हल्ली आपल्याला, दुसर्याला जे सांगायचे ते समोरासमोर न सांगता वेगळ्या मार्गाने सांगायची अशी रीत असल्यामुळे आम्ही हा मार्ग अवलंबिला, कारण स म स पाठवणे आम्हाला आमच्या उरलेल्या बॅलन्समधे शक्यच नव्हते. त्यासाठी वेगवेगळ्या मजकुराचे टी-शर्ट मिळतात म्हणे. अर्थात भगवा झेंडा दिसला की आम्ही रस्ता बदलायचो, म्हणजे त्या फुटपाथवर भगवा रंग दिसला की आम्ही अलीकडच्या फुटपाथवर ! तोंड चुकवायचो, पण आम्ही धीर सोडला नाही. भगव्या वस्त्रांचे आम्हाला लहानपणापासूनच आकर्षण. या रंगाचे आम्हाला फार म्हणजे फार कौतुक वाटते. देवाने हा रंग जन्माला घालताना सगळ्यात जास्त कष्ट केले आहेत असे आमचे ठाम म्हणणे आहे. नाहीतर धड लाल नाही धड पिवळा नाही, असा रंग आमच्या ओशो सरांना का आवडला असता बरे ? आम्हाला तर त्यांच्या आश्रमाच्या अवतीभवती हिंडायचे पहिल्यापासून वेड ! त्यांनी कायमची समाधी घेतल्यावर त्यांच्या गोर्या शिष्या कमी झाल्या आणि आमच्या त्या गल्लीतल्या तशा चकरापण कमीच झाल्या म्हणा. पण अधुनमधुन आमचे पाय आपोआप तिकडे वळतातच.
त्या दिवशी (मे महिन्यातली उन्हाने तळपणारी दुपार) आम्ही असेच ग्रॅंडमधून भर उन्हात बाहेर पडलो. तेथे आम्ही दुपारी काय करत होतो हे पुणेकरांना सांगायला नको. कॅमेरा बरोबर होताच. गळ्यात आमचा बोगस बिल्ला व डोळ्यावर गॉगल असा आमचा वेष असल्यामुळे आमची पावले आपोआप ओशोसरांच्या आश्रमाकडे वळली. आम्हाला तेथे प्रवेश नव्हताच त्यामुळे आम्ही तसे डुलत डुलत चाललो होतो. ग्रँडमधून तसे चालता येत नसेल तर बाहेर पडायला मना आहे. पण आम्हाला काही तो आश्रम सापडत नव्हता. चार चकरा मारल्या पण छे ! ग्रॅंडची कमाल म्हणावी तर तेथे तसे अचाट काही केलेलेच नव्हते. नेहमीप्रमाणे ५/६ च ! पण आज आश्रमाची पाटी नाही, भगव्या कपड्यांची ये जा नाही, च्यायला काय झालंय काय आज ? नेहमीच्या जागेवर दुसरीच पाटी दिसत होती. हे विचार आमच्या मनात घोळू लागले तेवढ्यात आमचे जमिनीवरचे पाय सुटले आणि आम्ही हवेत उचलले गेलो. त्यानंतर आमचे डोळे बांधण्यात आले. दोन तीन मिनिटांनी आम्हाला एका ठिकाणी आपटण्यात आले. काय बावळट लोक आहेत, आम्हाला सांगितले असते तर आम्ही तसेही आलो असतो की. पण असो. आपटल्या आपटल्या आमच्या तोंडून एक भला मोठा ढेकर बाहेर पडला. तो ऐकताच, आम्हाला सन्मानाने एका चांगल्या बैठकीवर बसवण्यात आले. हा कशाचा चमत्कार असावा हे काही आमच्या त्यावेळी लक्षात आले नाही पण थोड्याच वेळात त्याचाही उलगडा झाला. जडावलेले डोळे उघडून बघितले तर आम्ही एका भल्या मोठ्या मंडपात येऊन पडल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही त्वरेने आमचा कॅमेरा घेऊन त्या मंडपाचा फेरफटका मारला. जे आम्ही बघितले त्यावरून समाजाच्या उद्धाराची कळकळ किती उच्च स्तरावर पोहोचली आहे याची खात्री पटून आमचा ऊर अभिमानाने भरून आला आणि आमच्या डोळ्यात पाणी आले.