आमची(ही) निष्काम साहित्यसेवा....

*******************************************************************************************************

लिहायला सुरुवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहितोय हे कुणालाच कळायचं नाही.....(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा. तर कधी ठणठणपाळ यांच्या लेखनावरून प्रेरित असायचे. नशीब ..., केशवकुमारांचे विनोद आमच्या डोक्यावरून जायचे बर्‍याचदा, त्यामुळे त्यांच्या वाटेला कधीच गेलो नाही. तसेच आमचेही लेखन कुणाला कळायचे नाही. पण ते खपून जायचे आणि कुणी आक्षेप घेतलाच की यांचे लेखन पु.ल. किंवा वपुंप्रमाणे भासते तर म्हणायचो साळसुदपणे....

"अरे व्वा, माझे लेखन तुम्हाला पुलंच्या लेखनाप्रमाणे भासतेय म्हणजे नक्कीच पु.ल. हे चांगले लिहीत असले पाहिजेत."

किंवा गंभीरपणे डोक्यावरच्या (उरल्या सुरल्या) केसांतून हात फिरवत म्हणायचो.....

"ह्म्म्म, अहो आमच्या लेखनावर तर लहानाची मोठी झाली वपुंची पिढी, आता आमच्या लेखनावर वपुंच्या लेखनाचा प्रभाव म्हणा की वपुंच्या लेखनात आमच्या लेखनाची लक्षणे म्हणा ते साहजिकच आहे ना." (रच्याकने एकदा हा वपु की कोण म्हणतात तो वाचायला हवा...!)

एकंदरीत काय तर आमचे सुरुवातीचे सगळेच लेखन असे इन्स्पायर्ड वगैरे म्हणतात तसे असायचे. आपला महेश भट्ट नाही का 'घोस्ट' वरून प्रेरित होवून 'प्यार का साया' काढतो. आता तुमच्यासारखे विघ्नसंतुष्ट लोक त्याला चोरी म्हणतात. पण ते चालायचेच, कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीने भारून जाणे माहीतच नाही. आता मला सांगा 'वाल्मीकींच्या रामायणावरून प्रेरणा घेऊन संत तुलसीदासांनी 'तुलसी रामायण' रचलंच ना?.... मग...., त्यांना नाही कुणी चोर म्हणून हिणवलं? पण साहित्याच्या क्षेत्रात हे चालायचंच. मी तर म्हणतो आजच्या जगात जिथे सगळीकडेच पक्षीय राजकारण केले जातेय तेथे साहित्यिकांनीच का मागे राहावे? आत्ता एखाद्या धारपांनी ढापल्या स्टिफन किंगच्या कल्पना, पण म्हणून का ते लगेच चोर ठरतात. नाही, कारण त्या पाश्चात्य कल्पनांना भारतीय वातावरणात सूट होईल असे रूप देऊन ते लेखन लोकप्रिय करणे ही काय खायची गोष्ट आहे का? पण मग त्याच न्यायाने आम्ही जर धारपांच्या कल्पना ढापल्या तर आम्ही मात्र लगेच वाङ्मय चौर्याचे आरोपी ठरणार. असो...., आपण निरपेक्ष बुद्धीने साहित्य सेवा करत राहायची म्हणजे राहायची. मग कुणी काही का म्हणोत....! अहो, क्रांतिकारकांच्या नशिबी असले भोग असतातच, त्याला पर्याय नाही.

आम्ही मात्र आईच्या पोटात असल्यापासून साहित्याची निर्विकार (?) (की निरपेक्ष) सेवा करायचे ठरवले असल्याकारणे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असे मनाशी ठरवूनच टाकले होते. अहो, आपल्या जगाची रीतच आहे ही, कोणी जरा वेगळी वाट हाताळतोय असे दिसले की त्याच्यावर तुटून पडणार्‍यांचीच संख्या भरपूर असते आपल्याकडे. आणि आम्हीच नव्हे तर अशी निरपेक्ष सेवा करणार्‍यांवर समाज नेहमीच टीका करतो हे आजपर्यंत नेहमीच सिद्ध झालेले आहे. उदा. संगीत क्षेत्रात नदीम्-श्रवण, दिग्दर्शन क्षेत्रात भट कंपनी, साहित्य क्षेत्रात ज्येष्ठ साहित्यिक श्री. विशाल कुलकर्णी अशा निष्काम कर्मयोग्यांना नेहमीच समाजमनाच्या दुटप्पीपणाचे लक्ष्य व्हावे लागलेले आहे. पण आम्ही या सर्व टीकेकडे दुर्लक्ष करून आपली निष्काम साहित्यसेवा अशीच सदोदित चालू ठेवायचे व्रतच घेतले आहे म्हणाना.

मुळातच कुठल्याही टीकेला भीक घालायची नाही असे ठरवले असल्याने आम्ही स्वतःदेखील काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच करत आलो आहोत. आता हेच बघा ना, पुलंच्या काही किश्श्यांमध्ये आमच्या लिखाणाची ल़क्षणे आढळतात....