आमची(ही) निष्काम साहित्यसेवा....- भाग ३

वर नतद्रष्ट विचारतात कसे...

"अरे शिंच्या, साहित्याचा एवढा कळवळा आहे तर निदान मराठीत तरी उत्तीर्ण होवून दाखव ना!"

त्या मूढ जिवास आमच्या वर्षानुवर्षे एकाच वर्गात राहण्यामागचा त्याग कसा लक्षात यावा? मला सांगा उत्तीर्ण होवून वरच्या वर्गात गेलो की इतर विषयही अभ्यासणे आले आणि त्यामुळे साहजिकच साहित्यसेवेला दिला जाणारा वेळ विभागला जाणार. आमच्यासारख्या निष्काम कर्मयोगी साहित्य साधकाला हे कसे बरे मंजूर व्हावे? म्हणून आम्ही त्या शारीरिक छळाची पर्वा न करता अलिप्तपणाने (ते त्याला निर्लज्जपणाने म्हणत) आमची साहित्यसेवा करत राहिलो.

असो, तर आम्ही चिमणरावावरून प्रेरित होवून एक नवीन पुस्तक लिहायला घेतले. मुळात एका व्युत्पन्न ब्राह्मणाला असे बावळट आणि विसरभोळे दाखवण्याच्या चिवींच्या निषेधार्ह कृत्यामुळे आम्हाला अतिशय सात्त्विक असा संताप आणि मनस्ताप झालेला होता. तत्कारणे आमच्या कथेत आम्ही नायकाला अतिशय कुशाग्र, तैल बुद्धीचा आणि बुद्धिमान दाखवण्याचे योजिले. खरेतर आमच्या नायकाला चंद्रवदन असे नाव द्यायचे आमच्या मनात होते. पण आमच्या एका प्रिय शिष्याने आम्हाला विनंती केली की 'गुरुवर्य, हे नाव आपण मला द्या. मी ते माझ्या रहस्यकथांच्या नायकाला देईन.' आमचा स्वभाव मुळातच भोळा आणि दानशूर कर्णाप्रमाणे उदार असल्याने अतिशय आनंदाने ते नाव आम्ही आपल्या शिष्याला भेट म्हणून देऊन टाकले. (तो पुढे मराठी भाषेतील आद्य रहस्यकथाकार म्हणून विख्यात झाला. आपल्या बहुतेक सर्व लेखनात त्याने आपल्या नायकाला 'इरसाल' ही उपाधी बहाल करून एकप्रकारे आम्हाला गुरुदक्षिणाच दिली आहे)

आम्हाला आमचा नायक चिमणरावांप्रमाणे नेभळट आणि बुळबुळीत नव्हे तर धाडसी आणि चतुर दाखवायचा होता. पण चिवींना त्यांच्या कृत्याची जाणीव करून द्यायची या उदात्त (आमचे मास्तर त्याला खवचटपणा म्हणाले होते) हेतूने आम्ही आमच्या नायकाचे नाव 'खमणराव' तर त्याच्या सन्मित्राचे नाव 'रड्याभाऊ' ठेवले. या महाकादंबरीचे पहिले प्रकरण आम्ही आमचे भाषेचे मास्तर श्री. चिरगुडे गुरुजी यांना अर्पण केले होते आणि त्यांच्या अभिप्रायार्थ आणि सुचनांसाठी म्हणून त्यांना वाचावयास दिले.

"शिंच्या, सुक्काळीच्या, आधी चौथी इयत्ता उत्तीर्ण हो आणि मग कर हे असले उपद्व्याप! (आणि चोर्‍याच करायच्या आहेत तर त्या पकडता येऊ नयेत अशा पद्धतीने तरी करा!" असा अनमोल सल्लादेखील दिला.)

अखेर अशा अतिशय तीव्र आणि निराशाजनक अभिप्रायासहित त्यांनी आमची निरपेक्ष साहित्यसेवा त्यांची सकाळची तपकीर भाजायच्या कामी खर्च केली. आमची पहिली वहीली महाकादंबरी अशा रितीने जन्माला येण्याआधीच मृत झाली. एवढेच नव्हे तर आमच्या तीर्थरूपांना विद्यालयात बोलावून 'हे पाहा आपल्या पाल्याचे नसते उपद्व्याप!' असे म्हणून आमचे लिखाण दाखवून आमच्या साहित्यसेवेची क्रूर थट्टादेखील करण्यात आली. नंतर तीर्थरुपांनी निरगुडीच्या ओल्या फोकाने आम्हाला झोडपून काढले ते वेगळेच. पुढचे कित्येक दिवस आमचे शिक्षक आणि आमचे मित्र देखील 'या लेखक' असे म्हणून आमचे स्वागत करत असत ही त्यातल्या त्यात सुखाची आणि आनंदाची बाब. (नंतर नीट लक्ष देऊन ऐकले असता ते लेखक न म्हणता 'लेखकु' म्हणत असे आमच्या ध्यानात आले) पण आम्ही अतिशय मोठ्या मनाने त्यांना क्षमा केली.

'अरे मुढांनो, तुम्हाला काय कल्पना केवढ्या मोठ्या आणि महान कादंबरीला मराठी साहित्यसृष्टी केवळ तुमच्या क्षुद्रबुद्धीमुळे मुकली आहे ते.......!"