संपादकीय

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

होळी विशेषांक आपल्या हातात देताना आज मला हसू येते आहे. हा विनोदी विशेषांक आहे म्हणून नाही, तर त्यात एक लेख लिहिताना माझी जी फेफे उडाली ती आठवून. मी लेख लिहिला आणि नंतर वाचला तर मला एकदाही हसू आले नाही. घाबरून तो मी माझ्या एका मित्राला वाचायला दिला आणि तो खो खो हसत सुटला. हे गणित काही मला समजले नाही आणि उमगलेही नाही.

विचार केल्यावर थोडेसे उमगले की गालफडे मागे सारली आणि दात विचकले की त्याला हसणे असे संबोधता येत नाही. आपण जे हास्य क्लबामध्ये बघतो ते हसणे नाही. मग हसणे म्हणजे काय ? आणि का हसतात माणसे ? आपले हसणे माझ्यामते हे आपल्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असते. कारण ते आपल्या मनावर परिणाम करत असते. एखाद्या परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्याला गुदगुल्या केल्या तरी हसू येणार नाही, विनोदी वाचनाने तर सोडाच. तेच संध्याकाळी मित्रांच्या सोबत, अत्यंत टुकार अशा विनोदाला तो डोळ्यात पाणी येईतोपर्यंत हसतो. थोडक्यात काय, हसणे ही मनाच्या एका विशिष्ट कंगोर्‍याची देणगी आहे. आपल्याला कित्येकदा जुन्या गोष्टी आठवून हसू येते. ते खरे हसणे. मी तर एकदा एका स्त्रीला तिची एकुलती एक मुलगी गेलेली(वारली) असताना तिसर्‍याच दिवशी खदखदा हसताना बघितले आहे. तिला नंतर मी याबद्दल विचारल्यावर तिचे प्रामाणिक उत्तर होते “ काय करू, मला हसूच आवरेना!” त्या वेळी तिचा दीर आणि ती स्त्री मागच्या काही गोष्टी आठवत होते. मित्रांनो ही आहे ताकद विनोदाची आणि हसण्याची.

या अंकात अशी ताकद नसेल कदाचित, पण आपल्या चेहर्‍यावर एखादी तरी स्मितरेषा उमटावयाची, आपल्या मनाच्या त्या कंगोर्‍यात विनोदाने थोड्यातरी गुदगुल्या करायची ताकद निश्चितच आहे. तसे झाल्यास लेखकांना त्यासाठी दुवा द्यायला विसरू नका.

देवदत्ताने या अंकात देव-दानवांच्या क्रिकेटमुळे एका जुन्या पुस्तकाची आठवण ओसाडवाडीचे देव) करून दिली. पूर्वी लहानपणी हे पुस्तक हमखास वाचलेच जायचे. मुलांच्या सुट्टीचे आयोजन ही एक आपण स्वत:च अवघड करून ठेवलेली गोष्ट आहे, ती कशी ते वाचा जयबाला परूळेकर यांच्या लेखात. सध्याच्या न्यूज चॅनेलवर काय चाललंय हे विदारक सत्य वाचा सुहास झेले यांच्या लेखात. महेंद्र कुलकर्णी,विशाल कुलकर्णी, विनायक पंडित ह्यांचे मार्मिक लेखही आपल्या पसंतीस नक्कीच उतरतील. तसेच चेतन गुगळे आणि संकेत पारधी ह्यांचे किस्सेही आपली निखळ करमणूक करतील. गंगाधर मुटे यांची गवळण आपल्याला निश्चितच होळीच्या वातावरणात घेऊन जाईल. क्रांती साडेकर व विशाल कुलकर्णी यांच्या हजला,निशिकांत देशपांडे यांच्या वात्रटिका,आनंद घारे यांच्या खास होळकरी-कविता,प्रभाकर फडणीस,विद्याधर भिसे आणि संकेत पारधी ह्यांची विडंबने होळीच्या पूर्व संध्येला होणार्‍या कविसंमेलनाची आठवण करून देतील. हेरंब ओक आणि अपर्णा पालवे यांनीही बोलून या स्टेज वर आपली हजेरी लावली आहे.


होळीचे खास पदार्थ आपल्यासाठी सादर केलेत जयबाला परूळेकर ह्यांनी तर श्रेया रत्नपारखी ह्यांनी काही चुटके संकलित करून मिश्किली स्वरूपात सादर केलेत आणि सद्द्या सुरु असलेल्या क्रिकेटच्या विश्वचषकावर मार्मिक भाष्य करणारे व्यंगचित्रही तयार केलंय.

मुखपृष्ठ म्हणून आम्ही प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव ह्यांनी बनवलेले एक चित्र महाजालावरून साभार घेत आहोत. 

वेळात वेळ काढून सर्वांनी हा अंक एवढ्या कमी वेळात वाचण्यायोग्य केला त्या सर्वांचे अभिनंदन. त्यांचे आभार मानत नाही, कोणाचेच आभार मानत नाही कारण हा आपलाच अंक आहे.....

जयंत कुलकर्णी

३ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह..उत्त्तम.
जयंतकाका तुमचे विशेष अभिनंदन. देवकाका, श्रेया ताई, अनेक हाबार्स :)
आता अंक वाचायला घेतो...

Deepak म्हणाले...

अभिनंदन! अभिनंदन!!

Gangadhar Mute म्हणाले...

व्वा.फ़ारच सुंदर अंक.
फ़ारच देखणा अंक.