पिवून घ्यावी..!

मायबोलीवरील एक ज्येष्ठ गझलकार श्री. निशिकांत देशपांडे यांची ही सुंदर गझल बघितल्यावर राहवले नाही. नकळत माझ्यातला ’इरसाल म्हमईकर’ जागा झाला आणि जन्माला आली एक हझल.....!!
निशिकांतजींच्या अनुमतीनेच ही हझल मी आपल्या होळी विशेषांकासाठी देत आहे, अनुमतीबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !!
श्री. निशिकांत यांची मुळ गझल इथे वाचा : http://www.maayboli.com/node/24018
वृत्त : हिरण्यकेशी

लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

पिवून घ्यावी..! उद्यास कोठे... असूत किंवा नसूत मित्रा...

पुन्हा नव्याने जुन्याच जागी तसेच सारे जमूत मित्रा
परमिटरुमच्या चविष्ट गप्पा पुन्हा जरा आठवूत मित्रा...

मनात खळखळ, उरात धडधड, हळूच येइल शिपायदादा
परमिट नाही खिशात आता पचवुन दारू नडूत मित्रा...
.
मुखात व्हिस्की, करात चखणा.., झणी बिपाशा दिसेल आता
नवथर कोर्‍या, नव्या भिडूला पुन्हा अता आवरूत मित्रा...

उगाच तूम्ही मला चिडवता, तशात दारू पुन्हा उतरते
भरून प्याले अबोल होणे स्मरून खळखळ हसूत मित्रा...

   तुडुंब भरता उदर सुरेने पुन्हा स्मरे मग सखी नशीली
अखेरची ती सिगार होती, स्मरून तिजला रडूत मित्रा...

चटावलेल्या जिभेस लहरी, हवी विदेशी मधूमदीरा
पहा कसे काजवे चमकती, पिऊन देशी पडूत मित्रा...

पहाट होता हळूच सांगू भरावयाला अजून मधुरा
नको उतारा, उगाच आता, पुनश्च प्याला भरूत मित्रा...

उतावळा तू मनात इतका कशास "विशल्या" लटपटण्याला ?
पिवून घ्यावी..! उद्यास कोठे... असूत किंवा नसूत मित्रा..
.
नव-ग(ह)झलकार इरसाल म्हमईकर.... तथा विशाल कुलकर्णी

1 टिप्पणी:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

मस्त विशालदा, आवडली हझल एकदम इरसाल :)