माउस चोरीचा किस्सा!

माझ्या मित्राने मला सांगितलेला माउस चोरीचा किस्सा,मराठीत शब्दबद्ध आणि अनुवाद करून सांगतोय...

 अभियांत्रिकीला येणार्‍या सगळ्याच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान असतेच असे नाही. काही दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कधी संगणक पाहिलादेखील नसतो. असाच एक दुर्गम भागातून आलेला मुलगा माझ्या शाखेत (c.tech ) होता. बेट्याने पहिल्यांदाच संगणक बघितलेला, वर त्याच्या दादाने त्याला वापरायला म्हणून ल्यापटॉप घेऊन दिला. आता मित्र जे  सांगतील ते तो करायचा. एक म्हणाला, "अरे ल्यापटॉप खूप नाजूक असतो, कीबोर्ड आणि माउस लवकर बिघडतात. तू वेगळे कीबोर्ड-माउस घे."

त्याचे रुमीज महाचोर वगैरे प्रकारातले होते. त्यांनी सल्ला दिला, " अरे आपण माउस कॉलेजातून आणूया. कीबोर्ड आणता येणार नाही म्हणून नाईलाज आहे. तो तू विकत घे."
झालं, पठ्ठ्याने ह्या कामी माझी मदत घ्यायचे ठरवले, कारण मी त्याचा चांगला मित्र होतो.

मी: अबे १५०-२०० येतो माउस, चल धंतोली,आणू आपण आताच.

तो: अबे आपल्या ल्याबमधून कोणी-न-कोणी माउस चोरतच राहतो. काही मोठी गोष्ट नाही. कायले पैसे खर्च करू मी?  उद्या आणू ल्याबमधून ढापून. आपण प्रॅक्टिकल संपले, सगळे गेले की एक माउस चोरू.
मी: अबे, कोणी पाहिले तर वांदा होईल ना बे .

तो: अबे, मी काढतो माउस, तू दारावर लक्ष ठेव. कोणी येऊन त नाही राहिला ते बघ . कोणी येतांना दिसला की लगेच मला इशारा कर.

मी 'हो' म्हणालो आणि दारावर उभा राहिलो. बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नव्हता. माउस चोरायला वेळ तो किती लागणार ?  माउस काढा, गुंडाळा आणि ब्यागेत टाका, झाले. पण हा येत नही बघून मी होतंय काय बघायला मागे वळलो.
हा खाली वाकून काहीतरी करत होता. मी गेलो आणि विचारले, "अबे , का करून राहिलास बे ? "
तो: हातातला ब्लेड दाखवत म्हणाला,  अबे केबल कापून राहिलो माउसचा, वेळ त लागलच न बे ?
मी: अबे तू पागल झालास का बे , माउस चोरायले केबल काहून कापून राहिलास बे?

मी पाहिले, त्याने अर्धाअधिक केबल कापलेला होता. त्याला वाटले की आपण दोन वायर जोडतो तसे माउसचा वायर ल्यापटॉपला जोडता येत असेल. माउस कसा काढायचा ते त्याला माहीतच नव्हते.
मी म्हणालो,  "आता ते ठेव तसेच आणि निघूया येथून, बराच वेळ  झालाय, कोणी पाहिले तर गडबड होईल. आता हा माउस काही कामाचा राहिला नाही तसाही."

त्याने तो कापलेला माउस तिथे गुंडाळून ठेवला आणि आम्ही पळालो.

पुढच्या प्रॅक्टिकलला सर म्हणाले की, माउसचे केबल कापण्याच्या खोड्या करतांना पुढच्या खेपेला कोणी आढळले तर सस्पेंड करेन त्याला. ती खोडी नव्हती तर माउस चोरण्याचा प्रयत्न होता हे त्यांच्या गावीही नव्हते. कोणी माउस चोरायचा "असा" प्रयत्नही करू शकतो याचा त्यांनी कधी विचारही केला नसणार. त्याची ही माउस चोरी आम्हा मित्रांमध्ये अजरामर झाली आणि त्याचे माउसचोर हे नावदेखील !!


लेखक: संकेत पारधी