देव व दानव ह्यांतील क्रिकेट!

खेळ ही भारतीय संस्कृतीतली एक विरंगुळा प्रदान करणारी विलक्षण अनुभूती देणारी, व्यायाम करविणारी गोष्ट. त्यात क्रिकेट ह्या खेळाने तर बहुतेक सर्वजणांच्या मनाचा ताबा घेतलाय आणि सध्या क्रिकेट विश्वचषक ही सुरु आहे, तर मग थोडे त्यातलेच. :)


क्रिकेट हा खेळ भारतात १९३२ साली सुरु झाला. त्याआधी १८८९ साली इंग्रज आणि ऑस्ट्रेलिया ह्यांच्यात पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळले गेले असे जरी मानत असले तरी हे खोटं आहे. हो, 'लगान' चित्रपटामधील क्रिकेटचा सामनाही फार नंतरचा आहे. त्या आधीच क्रिकेट आपल्याकडे खेळले गेले होते. अहो, क्रिकेटची उत्पत्ती वेदकालीन आहे. ते कसं असं तुम्ही विचारताय ना? ऐका तर मग.

करकट हा संस्कृत शब्द बहुतेक क्रिकेट साठीच वापरत असतील. तसेच आपण जे स्टंप शब्द म्हणतो तो शब्द आला कुठून माहीत आहे? नाही ना? अहो, संस्कृत शब्द स्तंभावरून.

आता गणेश स्तोत्र बघा ना. त्यांची सर्व नावे ही त्याच्या”ऑल राऊंड परफॉर्मन्स’वरून पडली असावीत.

प्रथम वक्रतुंड - वक्रतुंड म्हणजे Angular. तुंड चा इंग्रजी शब्द म्हणजे Thunder. म्हणजे गणपती वेगवान आणि स्विंग बॉलर होते.
एकदंत म्हणजे One Down. गणपती एक बाद झाल्यावर जायचे.
कृष्णपिंगाक्ष म्हणजे त्यांना काक दृष्टी अथवा Sharp Reflection होते.
गजवक्र म्हणजे गजासमान हळू हळू येऊन चेंडू टाकून फलंदाजाला चकविणे. थोडक्यात गणपती फिरकी गोलंदाजही होते .
विकटमेव म्हणजे श्रेष्ठ विकेटकीपर.
विघ्नराजेन्द्र म्हणजे संकटात कप्तान म्हणून श्रेष्ठ असलेला.

थोडक्यात म्हणजे क्रिकेट फार पूर्वीपासून चालू आहे.ह्याची उत्पत्ती करणार्‍या देवांना वाटले असेल का हो की आपण खेळावे म्हणून? आता आपण एक Dream Sequence बनवूया.

देव आणि दानव ह्यांच्यात क्रिकेट खेळले गेले. देवांच्यात इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण, प्रजापती, गणपती, हनुमान वगैरे दिग्गज होते तर दानवांच्यात हिरण्यकश्यपू, रावण, विभीषण, कुंभकर्ण, राहू, केतू वगैरे Demons होते. पंच म्हणून अर्थातच कळीचा नारद होते. देवांना प्रथम फलंदाजी हवी होती, कारण प्रथम क्षेत्ररक्षण करून थकण्यापेक्षा प्रथम फलंदाजी करून राक्षसांना थकल्यावर बाद करणे सहज शक्य होते. ही गोष्ट नारदाला कळली व लागलीच ते गेले कळ लावायला. दानवांना त्यांनी सांगितले, "अरे दानवांनो, तुम्हाला माहीत आहे का की देव नाणेफेक जिंकल्यावर काय घेणार आहेत ते? अहो, चक्क गोलंदाजी घेणार आहेत. तुम्हाला मी काय सांगू? तुम्ही जर प्रथम गोलंदाजी केली तर देवांची दैना होईल. पण आधी हे सगळे तुमच्या नाणेफेक जिंकण्यावर व तुमच्या विचार शक्तीवर अवलंबून आहे. देव तरी हेच बघतील की तुम्ही प्रथम फलंदाजी करावी. नारायण नारायण."
नारद गेल्यावर त्यांच्या भाषणाने राक्षसांच्या मनात गोलंदाजीचे खूळ भरले व जेव्हा नाणेफेक झाली तेव्हा राक्षस जिंकले व त्यांनी क्षेत्ररक्षण घेतले.

देवांकडून चंद्र व सूर्य Opener म्हणून गेले. दानवांनी शुक्राचार्यांना विचारून सगळे समजावून घेतले व Opener म्हणून राहू व केतूला गोलंदाजी दिली. पहिली ओवर राहूने सुर्याला टाकली. सकाळी सूर्य थोडा थंड असल्याने पहिली ओवर मेडन गेली. दुसरी ओवर केतूने चंद्राला टाकली. मात्र सूर्य समोर तळपू लागला व चंद्राला काहीच दिसले नाही आणि तो लवकर आउट झाला. नंतर कळले की त्या दिवशी चंद्रग्रहण होते.