देव व दानव ह्यांतील क्रिकेट! - भाग २

नंतर पवन अर्थात वायू आला. जसा गोलंदाज चेंडू टाके तसा पवन पुढे जायचा व पवन पुढे गेल्यामुळे चेंडू पाठी जाई. पण तो जेव्हा Non striker वर होता व थोडा पुढे जाई तर चेंडू स्विंग व्हायचा. देवांना पवन असेपर्यंत खेळणे अवघड झाले व इंद्र, सूर्य, प्रजापती वगैरे देव लवकर बाद झाले. परंतु आठव्या विकेटसाठी गणपती आणि हनुमान ह्यांनी उत्कृष्ट खेळी करून हजार पंधराशे धावांचा डोंगर उभारला.

दानव जेव्हा फलंदाजी करायला आले तेव्हा थकले होते. पण तरीही चांगला खेळ करून धावसंख्या वाढवत होते. परंतु गणपतीने सोंडेचा सुरेख वापर करत गोलंदाजी करून राक्षसांची दैनाच केली. रामाने रावणाला पायचीत केले. अर्थात प्रेक्षकातील सीतेवर लक्ष गेल्यामुळे रावण आउट झाला. हिरण्यकश्यपू जेव्हा रन काढूच शकला नाही तेव्हा त्याने स्टंप वर लाथ मारली. लगेच त्यातून नरसिंह आले. त्यांनी हिरण्यकश्यपूचा त्रिफळा उडविला. नरकासुराला कृष्णाने बाद केले. कृष्णाला कंसाने खूप मारण्याचा प्रयत्न केला (म्हणजे त्याच्या चेंडूला बरं का?) पण कृष्णाने त्याचा डाव ओळखून त्याला काहीच करू दिले नाही व शेवटी त्याचा त्रिफळा उडविला.
शिशुपालाचे १०० झेल सोडले तरीही त्याने शेवटी एक चूक केली व कृष्णाने सुदर्शन चक्र सोडले, म्हणजेच गुगली टाकले व शिशुपाल गेला.

प्रत्येक खेळाडू बाद झाला की यम येऊन त्यांना पॅव्हीलीयन मध्ये घेऊन जायचा. देवांचे पॅव्हीलीयन म्हणजे स्वर्ग व दानवांचे नरक.

असो. ह्यात देव जिंकले.

पण सांगण्याचा मुद्दा हा की क्रिकेट हे आपल्याकडे फार पुर्वी म्हणजे देवादिकांपासून सुरु आहे. आपण ह्याचे पेटंट आपल्याला मिळायची मागणी करू शकतो ना? ;)

(देव आणि दानवांच्या ह्या खेळाची कल्पना मला आमच्या संकुलात गणेशोत्सवात केलेल्या निवेदनात मिळाली. माझ्या लहानपणीचे ते लेखन मला आता मिळाले. त्यातील इंग्रजी शब्दांचे भाषांतर करून व नाममात्र बदल करून मी तुमच्या समोर सादर केले. कोणाचीही टिंगल/अपमान करण्याचा ह्यात हेतू नाही.)

लेखक: देवदत्त गाणार!

२ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

मस्त! मजा आली वाचायला.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

हे हे हे मस्त :)