आमची(ही) निष्काम साहित्यसेवा....- भाग २

आम्ही आमच्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पातळाऐवजी आमचे 'आसक्तीचे विनोद' हे पुस्तक दिले.(आमचे हितशत्रू त्या पुस्तकास 'सक्तीचे विनोद' असे संबोधीत करत असत) त्या पुस्तकावर लिहिले,

'प्रिय सौभाग्यकांक्षिणी, वज्रचुडेमंडित लाडके पत्नीस,

तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसंगी पातळाऐवजी पुस्तक देण्यामागील विशुद्ध हेतू फसवणूक नसून हसवणूक हाच आहे.

तुझाच विनोदी लेखन करणारा अती-साहित्यिक पती!'

अर्थात आमच्या बायकोचं विनोदाशी वाकडंच असल्याने तिने थेट आमच्या मातोश्रींकडे धाव घेतली. मातोश्रींनी त्यांच्या खास शैलीत आम्हाला समजावले, 'बावळ्या, आपल्याकडे नवर्‍यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!" (त्यातील विनोदांची नंतर आमच्या हितशत्रूंनी अतिरेकी विनोद अशी कुचेष्टा केल्याचेही आम्हांस आठवते, असतो एकेकाचा स्वभाव.)

(आता आपल्या या कृत्यामुळे आपल्याच मुलाला मिळणारा एक जास्तीचा वाचक आपण हिरावून घेतला हे त्या पूज्य मातेच्या ध्यानीमनी नसेल. एखाद्या लेखकाचा वाचक हिरावला जाणे (ते ही त्याचं लेखन वाचणारे, मुळात कळणारे फारसे कुणी नसताना) यासारखी शोकांतिका नाही हो लेखकाच्या आयुष्यात.

पण खरा किस्सा पुढेच आहे. आमच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग कुणीतरी पुल भक्ताने आरामात पुलंच्या नावावर खपवला. काय तर म्हणे....

एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पातळाऐवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहिले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पातळाऐवजी पुस्तक देण्यामागील विशुद्ध हेतू फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रिकेखाली स्वाक्षरीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्‍यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!" (किती साळसुदपणे कुणाचेही विनोद कुणाच्याही नावावर खपवतात लोक? हे आई शारदे..., त्यांना क्षमा कर...! शेवटी तेही माझेच व्यवसाय बंधू आहेत)

असो, तर आम्ही आमच्या बालपणाच्या काही गोष्टी सांगत होतो. त्या वेळी चिविंचा चिमणराव खूपच गाजत होता. तो कोण एक चकणासा वाटणारा कलाकार चिमणरावाची भूमिका पण करायचा. चांगल्या गोष्टींवरून प्रेरणा घ्यायची चांगली सवय आमच्याकडे उपजतच असल्याकारणे आम्ही लगेचच एक पुस्तक लिहायला घेतले.

लक्षात घ्या तेव्हा आमचे वय फक्त पंधरा वर्षाचे होते. तेव्हा आम्ही इयत्ता चौथीत शिकत असू. आता तुम्ही म्हणाल पंधराच्या वर्षी चौथीत? पण आम्ही वर आधीच सांगितले आहे ना की आम्ही आमचे जीवन निष्काम साहित्यसेवेला समर्पित केलेले होते. त्यामुळे इतिहास-भूगोल, सामाजिक शास्त्रे किंवा गणित-विज्ञान अशा निरस विषयांना आम्ही अजिबात भीक घालत नसू. अरे, मराठी भाषा इतकी समृद्ध असताना इतर क्षुद्र विषयांकडे लक्ष द्यावेच का म्हणून आम्ही? आमचे हे बहुमूल्य, क्रांतिकारी मत एकदा आम्ही आमच्या अजाण मास्तरांसमोर व्यक्त केले तेव्हा त्याला आमची कळकळ कळलीच नाही आणि त्याने आम्हाला पाठ आणि गुडघ्याला कळ लागेपर्यंत अंगठे धरून उभे केले. अखेर आमची कळकळ त्यांच्यापर्यंत पोचावी आणि त्यांनाही साहित्यसेवेचा कळवळा यावा म्हणून आम्ही आमची निष्काम साहित्यसेवेची संकल्पना अतिशय कळकळीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आमच्या कोवळ्या तळहातावर एवढ्या जोराने छड्या मारल्या की थेट मस्तकातच कळ गेली. (अर्थातच आमच्या मस्तकात, त्यांच्या मस्तकात संतापाने कळ गेली असेलही कदाचित !!)