आमची(ही) निष्काम साहित्यसेवा....- भाग ५

तर कविता अशी होती....

एका ओढ्यात होती...
बिनसोंडेची गजपिल्ले किती सुरेख...
होते अशक्त बावळे...
मानवी पिल्लू तयात एक ....

केवढी सुंदर आणि महान कल्पना होती बघा त्या निरागस काव्याची. ओढा हे मानवी जीवनाचे प्रतीक. मानवाला कायम अपेक्षा असते सुखा-समाधानाची पण ते कधीच मिळत नाही. जसे आमच्या या ओढ्यालाही कधीच पाणी नसे. बीन सोंडेचे हत्ती उर्फ डुक्कररूपी हे प्राणी ओढ्यातल्या त्या चिखलालाच जीवन मानून त्यातच डुंबण्यात आपले आयुष्य व्यतीत करत. पण त्यात एक मानवाचे दुबळे पण हुशार पिल्लुही (पक्षी कवी स्वतः) त्यांच्याबरोबर ओढ्याकाठी वास्तव्य करत होता. पुढे जाऊन त्यास त्या ओढ्याकाठीच भगवान बुद्धांप्रमाणे दिव्य ज्ञानाची प्राप्ती होणार होती. (हिच कविता पुढे थोडेफार क्षुद्र शब्द बदल करून कुणा एका क्षुद्र कवीने त्याचे रुपांतर एका गाण्यात केले जे पुढे खूप लोकप्रिय झाले. पण आम्ही उदार मनाने त्या गाण्याची रॉयल्टी मागण्यास नकार दिला.)

पण ते महाकाव्य पूर्णं व्हायच्या आधीच परीक्षेचा आणि त्याबरोबर आमचाही निकाल लागल्याने आमच्या संतप्त आणि अज्ञानी तीर्थरुपांनी आमचे नाव शाळेच्या पटावरून कमी करून घेतले. अखेर आमची रवानगी घरच्या रंगी आणि गंगी या दोन म्हशींचे उदरभरण करण्याच्या परम पवित्र कार्यावर करण्यात आली. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' मग ते दुसर्‍याचे का असेना या उदात्त विचाराने आणि निष्काम भावनेने आम्ही ते कार्य स्वीकारले.

सांगण्यास अतिशय आनंद होतो की आम्ही आपल्या निष्काम साहित्यसेवेला तिथेही खंड पडू दिला नाही. लवकरच रंगी म्हैस, तिचा प्रियकर टेकाड्या वळू आणि गंगी म्हैस यांच्या प्रेम त्रिकोणावर आधारीत एक महाकाव्य आम्ही रचून काढले. त्यात रंगी म्हशीच्या अंगावर बसून तिच्या केसातल्या क्षुद्र कीटकांवर आपले उदर भरण करणार्‍या गरीब बिचार्‍या कावळ्यांची हृदयद्रावक शोकांतिकाही आम्ही रंगवली होती.

सद्द्या आम्हांस रंगी व गंगीला घेऊन सटवाईने आमच्या भाळी रेखून ठेवलेल्या कार्यासाठी यमाईच्या माळावर जायचे आहे. न गेल्यास तीर्थरूप पुन्हा ओल्या फोकाने आमची पुजा बांधण्याचा संभव आहे आणि टेकाड्या वळूही त्या दोघींची वाट पाहत असेल. त्या प्रेमीजनांच्या मिलनात व्यत्यय आणणे आम्हांस योग्य वाटत नाही, अन्यथा आम्ही ते महा-महाकाव्य आपणास म्हणून दाखवले असते. असो पुढच्या वेळेस भेटू तेव्हा आपणास ते महाकाव्य नक्कीच वाचून दाखवतो. तात्पुरती आपणा सर्वांची रजा घेतोय. आम्हांस खात्री आहे की आपण सर्वजण ते महाकाव्य ऐकण्यास, वाचण्यास अतिशय उत्सुक आहात. तेव्हा पुढील भेटीत (जेव्हा आमच्या अशाच कुठल्यातरी निःस्वार्थ कृत्याने प्रेरित होवून आमचे तीर्थरूप ओल्या निरगुडीच्या फोकाने आम्हाला झोडपून काढतील, तेव्हा प्रकृतिअस्वास्थ्याच्या कारणाने काही दिवस आम्ही निवांतपणे आराम करू शकू) ते आपणासमोर मांडण्याचे आश्वासन देऊन आम्ही आता रंगी-गंगी-टेकाड्या अशी युती करून देण्यासाठी कटिबद्ध होवून यमाईच्या माळाकडे गमन करतो.

जय मराठी, जय आई सरस्वती !

इरसाल म्हमईकर

(तथाकथित बुद्धिवंतांच्या संकुचित आणि पक्षपाती वृत्तीमुळे अप्रसिद्ध राहिलेला एक ज्ञानी, व्यासंगी साहित्यिक)

**********************************************************************************************************

(तळटीप : प्रस्तुत लेखात उल्लेखित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. तेव्हा त्यांना कमी लेखण्याचा किंवा इतर कुणाही रसिकांच्या भावना दुखावण्याचा यात अजिबात हेतू नाही. हे लेखन केवळ एक विनोद म्हणून वाचावे आणि काही क्षणांपुरती मौज असे म्हणून विसरून जावे हि नम्र विनंती.

सस्नेह

लेखक: विशाल कुलकर्णी, भ्रमणध्वनी क्रमांक : ०९९६७६६४९१९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: