आमची(ही) निष्काम साहित्यसेवा....- भाग ४

तुम्हाला कल्पना यावी म्हणून आमच्या त्या महान लेखनातला एक नमुना तुम्हांस वाचावयास देतो आहे, ज्यावरून तुम्हांस आमच्या त्या लहान वयातील बुद्धीच्या महान झेपेची कल्पना येईल.

"रड्याभाऊच्या नेहमीच्या रडगाण्याकडे दुर्लक्ष करून खमणरावांनी आपल्या विलायती ओव्हरकोटाची कॉलर ताठ केली व कानापर्यंत ओढून घेतली, जेणेकरून कुणी पाहिल्यास ओळख पटू नये. (आमचे समकालीन पाश्चात्य गुप्तहेर कथा लेखक श्री. आर्थर कॉनन डायल यांनी नंतर ही कल्पना त्यांच्या शेरलॉक होम्स नामक एका खमणरावापेक्षा कमी बुद्धीच्या नायकासाठी वापरली. ब्रिटिशांचे गुप्तहेरखाते नक्कीच अतिशय तेज असले पाहिजे. अन्यथा आमच्या पूर्णंही न झालेल्या कादंबरीतील कल्पना त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली असती?) एका हाताने आपल्या खिशातील भिंग चाचपत (खमणराव ते भिंग आपल्या उपरण्याच्या घडीत गुंडाळून ठेवत असे. मागे एकदा ते भिंग हातात धरून काही कागदपत्रे तपासत असताना, भिंगावरून प्रकाश परावर्तित होवून रड्याभाऊच्या शेंडीला आणि टिळकछाप मिशीला आग लागली होती. सर्वसाधारण भिंगावरून प्रकाश परावर्तित होवून एकाच ठिकाणी आग लागू शकते. पण खमणरावाच्या भिंगावरून प्रकाश एकाच वेळी एकापेक्षा जास्त ठिकाणी परावर्तित होत असे हे यावरून ध्यानात येते. तसेच त्याकाळी देखील खमणरावाकडे किती आधुनिक प्रकारची साधने उपलब्ध होती यावरही प्रकाश पडतो. तेव्हापासून खमणराव ही काळजी घेत असे) त्याने हलकेच गाजरे चघळणार्‍या रड्याभाऊला एक गुप्त इशारा केला. (हल्लीच प्रसिद्ध झालेल्या 'किटी' बाईच्या बॉसने बहुदा गाजरे खाण्याची कल्पना आमच्या रड्याभाऊंपासुनच उचलली असावी.) पण तो गुप्त इशारा न कळल्याने रड्याभाऊने ...

"काय रे हे खमण, हे काय एखाद्या त्रासलेल्या सासुरवाशिणीप्रमाणे चेहरा करून चित्रविचित्र खाणाखुणा करत आहेस. अशा खाणाखुणा फक्त बुधवारातल्या पिडीत स्त्रियाच करतात हे तूस ठावकी नाही काय?"

असे जोरात विचारून मूर्खपणाने आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले.

तूर्तास एवढाच उतारा पुरेसा आहे आमच्या बुद्धीची झेप तुमच्या लक्षात येण्यासाठी. वरील उतार्‍यावरून चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच की खमणराव हा वेषांतराबरोबरच अभिनयचतुरही होता. आपण गुप्तहेर आहोत हे सामान्य लोकांच्या ध्यानात येऊ नये म्हणून तो नेहमी उच्चकुलोत्पन्न सासुरवाशिणीचे (सदैव खाटकाला घाबरून असलेल्या गरीब गायीसारखे) भाव चेहर्‍यावर बाळगून असे. तसेच जाता जाता बुधवाराचा उल्लेख करून लेखकाने अतिशय चातुर्याने रड्याभाऊच्या स्वभावाचे आणि सवयीचे वर्णन केले आहे. याच वाक्यातून ही कथा पुण्यनगरीत घडते याचाही अंदाज काही चाणाक्ष वाचकांना बांधता आला असता. पण दुर्दैवाने ही महाकादंबरी रसिकाश्रय लाभण्याआधीच आमच्या मास्तरांची तपकीर भाजण्याच्या घृणीत कार्यात बलिदान पावती झाली आणि वाचक एका दिव्य अनुभवाला मुकले.

तपकीर नामक अतिशय उग्र वासाच्या मादक पदार्थाचा शोध लावणार्‍या त्या अज्ञात महाभागाचा तीव्र निषेध ! ( हे वाक्य वाचून आमच्या साहित्यसाधनेवर जळणार्‍या आमच्या हितशत्रूंनी आम्ही सदैव सदर्‍याच्या आतील खिशात बाळगत असलेल्या तपकिरीच्या कुपीवर आक्षेप घेऊ नये म्हणून आम्ही हे वाक्य आम्ही लहान अक्षरात लिहिलेले आहे.)

आम्ही आपली साहित्यसेवा तशीच प्रामाणिकपणे पुढे चालू ठेवल्यामुळे त्यावर्षीदेखील आम्ही इयत्ता चौथीतच मुक्काम करते झालो. इयत्ता चौथीची परीक्षा नापास होईपर्यंत आम्ही अजून एका साहित्यप्रकारावर आपली कुशाग्र बुद्धी अजमावून पाहिली होती. त्या काळात आम्ही आमच्या शाळेच्या मागे असलेल्या ओढ्याच्या चिखलात मनमुरादपणे डुंबणार्‍या बीन सोंडेच्या इवल्या इवल्या हत्तींवर एक अतिशय गर्भित अर्थ असलेली कविता केली होती. (डुक्कर हा शब्द एखाद्यास अतिशय हीन वागणूक द्यावयाची असल्यास वापरला जात असल्याने आम्ही त्यांच्यासाठी बीन सोंडेचा हत्ती हे अतिशय काव्यमय संबोधन वापरून आपल्या प्रखर आणि शोधक बुद्धिमत्तेचे एक ज्वलंत उदाहरणच सादर केले होते. तसेही शाळेत वर्गात बसून साहित्यसेवा शक्य नसल्याकारणे आणि आमचा शाळेत बसूनही काही उपयोग नसल्याने मास्तरांनी वर्गातून हाकलून दिलेले असल्याकारणे आम्ही कायम ओढ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आपल्या साहित्यसाधनेत रत असायचो.)