रूद्राक्षाच्या माळा - भाग ३

आता या मंडपाची शोभायात्रा पुरे असे वाटून आम्ही तेथून निघणार तेवढ्यात आम्हाला तेथे एक फाटका तरुण हातातले कागद फडकवत तीव्र स्वरात वेड लागल्यासारखा ओरडत असलेला दिसला. या सगळ्या गोंधळात तो काय ओरडत होता हे समजणे शक्यही नव्हते म्हणा. अधिक चौकशी केल्यावर त्याला सनातन प्रभातमधून भाड्याने आणलाय असे समजले. हे का? असे विचारल्यावर आम्हाला फार मजेदार उत्तर मिळाले. या सगळ्या कार्यक्रमाला दृष्ट लागू नये म्हणून ती बाळाच्या गालावरची तीट आहे असे सांगण्यात आले. या महासंमेलनावरच्या गालावरची ही बाळतीट आम्हाला फारच आवडली. आमची तर या मंडपातून जायची तयारीच नव्हती पण मागून येणार्‍या लोंढ्यामुळे आम्ही आपोआपच पुढे ढकलले गेलो.

या पुढच्या मंडपात तर अतोनात गर्दी उसळलेली दिसली. बर्‍याच कॉट्स टाकलेल्या दिसल्या.
व्वा! व्वा! रक्तदानाचा कार्यक्रम दिसतोय. एवढी गर्दी असेल तर भारताची एका दिवसाची रक्ताची गरज भागणार असे समजून आमचा ऊर अभिमानाने भरून आला व मन आदराने दाटून आले. पण थोडे पुढे जातो तर सगळ्या बिछान्यावर तमाम स्त्रीवर्ग पसरलेला होता. हा भेदभाव का व कशासाठी  असे आम्ही तावातावाने तेथल्या डॉक्टरांना विचारले तर त्यांनी आमच्याकडे विचित्र नजरेने बघितले. ती नजर बघून आम्ही त्यात विरघळून गेलो. पूर्ण विरघळायच्या आत आपले भांडण पुरे करावे हा पुणेरी विचार करून आम्ही परत एकदा तावातावाने त्यांना विचारले, “रुग्णांना पुरुषाचे रक्त हल्ली चालत नाही की काय?”
त्यावर त्यांनी आमची कीव करत आम्हाला समजुतीने चार गोष्टी सांगितल्या त्या तर फारच धक्कादायक होत्या. त्या कॉटवरून उठणार्‍या एका भगिनीला आम्ही मुलाखत देणार का? असे विचारल्यावर आपले केस उडवत त्या म्हणाल्या,
“इश्श! त्यात काय, देऊ की. चला गं यांची मुलाखत घेऊया!” असे म्हणताच १०-१५ भगिनींनी आम्हाला गराडा घातला. आमच्या मुलाखतीतील काही प्रश्नोत्तरे आपल्यालाही आवडतील.

आम्ही: आज रक्तदान केल्यामुळे आपल्याला बरे वाटत असेल नाही ?

त्या : इश्श ! अहो हे रक्तदान नव्हते काही.

आम्ही (बावळटासारखे): मग ?

त्या: ( तोल सावरत. अरे रे !) अहो ज्यांना ’त्याचा’ वास आवडत नाही ना त्यांना ते शिरेतून द्यायची सोय आहे येथे.

’त्याचा’ म्हणताना त्या अगदी नवर्‍याचे नाव घेताना लाजतात तशा लाजल्या.

आता पुढे “इकडून शिरेतून जाणे झाले आणि आमचे डोके अगदी हलके झाले बघा” असं ऐकायला मिळणार असे वाटले.

या मंडपात एवढी प्रचंड गर्दी का ? याचा उलगडा आम्हाला आत्ता झाला. त्या सर्व भगिनींना वंदन करून आम्ही कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. आमचा जीव आता तहानेने व्याकूळ झाला होता. पण त्या अख्ख्या जागेत प्यायच्या पाण्याचा एक थेंब दिसेल तर शप्पत. आता काय करावे … असा विचार करत असतानाच त्या सभामंडपात एकदम शांतता पसरली. प्रत्यक्ष महाराजांचे आगमन होत होते.

अहाहा काय ते तेज ! घोड्यांच्या शर्यतीचा मोसम असल्यामुळे त्यांचे आगमन खास घोड्यावरून करण्यात आले होते. तो तगडा पांढराशुभ्र घोडा आणि त्यावर आपले उघडेबंब महाराज ! व्वा ! जणू हत्तीवर दाढीवाला डास ! ;)   मला अगदी नवरात्रीची आठवण झाली. देवी नाही का वेगवेगळ्या वाहनांवरून येते ! आपल्या धर्माच्या परंपरा जपायची एवढी कळकळ बघून आम्ही अगदी भारावून गेलो. नाहीतर हल्ली कोणाला पडलंय हो धर्माचं ? तेवढ्यात आकाशवाणी झाली.

“कृपया शक्य झाल्यास शांतता बाळगावी. अर्थात आपले इतर कार्यक्रम चालू ठेवण्यास काहीही हरकत नाही. फक्त थोडेसे लक्ष इकडेही द्यावे. या कार्यक्रमाचा सगळा खर्च युनायटेड दारू लिमिटेडने केला आहे हे कृपया लक्षात ठेवावे.”

ते ऐकताच प्यायलेल्या दारूला जागून बहुतेकांनी आवाज बंद केला. अर्थात बाहेर हाकलले जाण्याची सुप्त भितीही मनात होतीच. सगळ्यांनी पटापट मिळेल त्या जागा व्यापल्या. व्यापल्याच म्हणावे लागेल कारण कोणालाही कसेही बसायची परवानगी नाईलाजाने देण्यात आली होती. आश्चर्य म्हणजे महाराजांनी आज एकदम प्रश्नोत्तराचाच कार्यक्रम चालू केला. बहुदा त्यांची झोपलेल्या श्रोत्यांसमोर भाषण करायची मानसिक तयारी नसावी. बर्‍यापैकी शुद्धीवर होते ते !