रूद्राक्षाच्या माळा - भाग ४

श्रोत्यांमध्ये २००/३०० माईक घेऊन स्वयंसेवक व स्वयंसेविका अडखळत, तोल सावरत फिरत होत्या, मध्येच धडपडत होत्या. पण कोणाचीही कसलीही तक्रार नव्हती. प्रश्नोत्तरे अर्थात वाघिणीच्या दुधातून आणि राष्ट्रभाषेत चाललेली होती. दैनिक मद्यरात्रच्या वाचकांच्या सोयीसाठी आम्ही ती खास मराठीतून देत आहोत. वाचा फक्त मद्यरात्रीत ! ( हे आम्हाला दूरदर्शनच्या बातम्यांवरून सुचलेले आहे.) असो !

महाराज : आपण मागच्यावेळी सोमरस विद्यापीठात संशोधित झालेल्या एका अस्सल भारतीय उपचार पद्धतीचे काय काय फायदे आहेत हे बघितले. बाळा,(महाराज एका वृद्धाकडे बोट दाखवून व जबडा फाकून हसत म्हणाले) सांगतोस का नाव त्या उपचार पद्धतीचे?

श्रोता : कोण विसरेल त्याचे नाव? ’अल्कोपाथी’ महाराज.

म : बरोबर ! आपण हे ही बघितले की अल्कोपाथीने १० मिनिटात चेहर्‍यावरचे फोड, माईटस्‌ची अ‍ॅलर्जी, १ तासात जखमा, एलोपिसीया, एमियोट्रोफीक लॅटरल सेरोसिस, २ तासात अरिथ्रायटीस, तेवढ्याच वेळात एबडोमिनल एओर्टीक एनिरिझम,  एन्थ्रॅक्स, एंजिना, धमन्यांतील चरबीचे विघटन, बेल्स पलसी, पाठीचे दुखणे, कॅटॅरॅक्ट, सी.ओ.पी. डी, ३ तासात भाजलेल्या जखमा, हर्पेस, तर एका दिवसात ब्रेस्ट कॅन्सर,ब्रेन कॅन्सर, कोलोन कॅन्सर, इत्यादी इत्यादी इत्यादी…. बरे करू शकतो. हे असताना परदेशी कंपन्यांची औषधे वापरून आपण आपला घामाचा पैसा कुठे पाठवतो ऽऽऽऽऽऽऽ…………?

सगळे श्रो. एका सुरात:  परदेशात!

म : याची गरज आहे का ?

सगळे.श्रो.ए.सू : नाहीऽऽऽऽऽऽऽऽऽ.

म. : त्या बाईंना जरा माईक द्या. हं बोला बाई. घाबरू नका. सांगा आपला अनुभव.

बाई : महाराज आपल्या या उपचार पद्धतीने माझे सगळे आजार बरे केले. मी आता आनंदाने माझे आयुष्य जगत आहे. महाराज ही आपलीच कृपा आहे. बरं याचे साइड इफेक्टही काही नाहीत. फक्त एकच – तो म्हणजे झोप. मला खात्री आहे तोही लवकरच दूर होईल.

म: आणि आपली आपल्या नवर्‍याशी होणारी भांडणेही थांबली असतील.

बाई : इश्श ! असे काय हो महाराज, आता आम्ही दोघेही अल्कोपाथीचे उपचार करतो ना एकमेकावर !

म: आवरते घेत… मागच्या वेळी आपण अल्कोपाथीतील अनेक औषधांचा वापर बघितला..

श्रो.: महाराज महाराज…..

म. : बोला, बोला. असे पुढे या. बोला…..

श्रो. : महाराज जय हो ! आपल्या कृपेने मी अल्कोपाथीचा दवाखाना काढला आणि मी आता आमच्या क्षेत्रातील सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा वजनदार माणूस आहे. ही आपलीच कृपा. या उपकाराची फेड म्हणून महाराज आपल्या स्कॉटलंड मधल्या जमिनीत मी रग्गड पैसे घातले आहेत.

म( जबडा फाकवत) : धन्यवाद. आपण मला जरा नंतर येऊन भेटा. तर मित्रहो, मैत्रिणींनो ( हे म्हणताना त्यांचा डावा डोळा जरा मिचकावल्यासारखा वाटला मला), सज्जनहो, दुर्जनहो, सर्वांनो, या अती प्राचीन पण दुर्लक्षिलेल्या उपचार पद्धतीचा आपण आज सर्वजण वापर करत आहोत ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे औषध किती घ्यायचे याचे काहीही प्रमाण नाही हे आपल्याला माहिती आहेच. कितीही प्या…..