समर-व्हेकेशन,सोनू आणि मी! - भाग २

आता उन्हाळी सुट्टीचं नामांकन ’समर व्हेकेशन’ झालं आणि सगळंच बदललं. पुरूषांच्या बरोबर बायकाही नोकर्‍या करू लागल्या. ’हम दो हमारा एक’ चा नारा आला. आजी-आजोबा एकटे राहू लागले,तर कधी वृद्धाश्रमात राहू लागले आणि पाश्चात्य राहणीप्रमाणे आपल्याकडेही बेबीसीटरची संस्कृती आली, पण तिलाही वर्षातून एक महिना रजा हवीशी वाटली. बरोबरच आहे म्हणा. आजी,काकी,मावशी म्हटलं म्हणून ते नातं थोडंच आहे? तो व्यवसाय झाला आणि मग प्रश्न आला तो छोट्यांच्या मे महिन्याच्या सुट्टीचा. त्यांचे मनोरंजन करण्याचा. त्यांना कुठे तरी गुंतवण्याचा.
आमचा सोनू म्हणजे जबरदस्त व्यक्तीमत्त्व! त्याचं समर व्हेकेशन म्हणजे कसं व्हायचं या प्रश्नाने आम्ही सर्व बेजार! मग सुरु झाली चौकशी वेगवेगळ्या क्लासेसची आणि शिबिरांची. पावसाळ्यात भुईछत्र उगवतात त्याप्रमाणे उन्हाळ्यात जागोजागी ही शिबिरे आणि समर व्हेकेशन क्लासेसही उगवतात.

एकदा मी व पमा जात होतो तेव्हा एका बिल्डिंगच्या खाली पाटी दिसली. सर्व वाद्ये,नृत्ये वगैरे शिकवले जातील.लगेच मी पर्समधून पेन व डायरी काढली,फोन नंबर आणि वेळ लिहून घेतली व एक दिवस शुभमुहूर्तावर या बिल्डिंगमध्ये गेलो तर तो क्लास होता चौथ्या मजल्यावर. धापा टाकीत दुखरा पाय ओढत चौथ्या मजल्यावर गेलो तर भलं मोठं कुलूप स्वागताला. काय तर म्हणे त्या दिवशी त्या बाईंचा वाढदिवस होता म्हणून क्लास बंद. मग परत एकदा अशीच चढाई केली. यावेळी मी,सोनू आणि पमा असा सारा संचच गेलो होतो. त्या दिवशी सुदैवाने मॅडम होत्या. त्यांनी कौतुकाने सोनूला विचारले, तुला यापैकी कोणते वाद्य वाजवायला आवडेल रे?
मला बॅंड वाजवायला आवडेल, असं म्हटल्यावर त्या मॅडमचाच बॅंडबाजा वाजला आणि तिचा चेहरा धपकन पडला. मग मी म्हटलं, अरे सोनू इथे बॅंड नसतो,तुला तबला,हार्मोनियम वगैरे यापैकी काय आवडेल ते सांग,तर त्याचं आपलं परत तुणतुणं! मग मी आपली गेलेच होते म्हणून खूप माहिती अगदी interest दाखवून विचारली. म्हणजे कॅसिओ त्याला वाजवायला बरा पडेल ना? तो कोणत्या कंपनीचा,किती रूपयांचा घ्यावा. त्याची फी किती,वार व वेळ काय,असे अनेक प्रश्न विचारले आणि तिला थॅंक्स म्हणत सांगितले की, आता त्याच्या डॅडीशी डिस्कस‌ करते आणि मग अ‍ॅडमिशन घेते. असं गोड गोड बोलत तिचा सोनूने केलेला पचका कमी करण्याचा प्रयत्न करीत तिचा निरोप घेतला.

मग रोज सकाळी वाचायला पेपर हातात घेतला की बातम्या वाचण्याआधी शिबिरांची आणि क्लासेसची जाहिरात बघू लागले. संपर्क साधा लिहिलं असेल त्या फोनवरील,घरातील काम आटोपल्यावर फोन करू लागले. पण काय व्हायचं की कधी सोनूचं वय कमी असायचं,तर कधी ठिकाण लांब असायचं,तर कधी फी भयंकर असायची,अशा अनेक कारणांनी एकेका क्लासवर,शिबिरांवर फुली मारली जात होती आणि सोनूला एंगेज ठेवणं कठीण जात होतं. खरंच ’शाळा थोर तुझे उपकार’ असं म्हणायला हवं. सोनूसारख्या ५०-६० मुलांना चार-चार तास सांभाळायचं, त्यांना शिकवायचं,खेळवायचं म्हणजे किती कठीण काम! मी राष्ट्रपती असते तर शिक्षिकांना जास्तीत जास्त पगार द्यावा(ज्यांना फारच कमी पगार मिळतो)असा वटहुकूम काढला असता. अजून सुट्टीचा एक आठवडाही संपला नव्हता. आमचं टेंशन वाढतच होतं.

संध्याकाळी फिरायला जायचा माझा दिनक्रम,पण लक्ष असायचं ते वेगवेगळ्या पाट्यांकडे आणि बॅनर्सकडे. एकदा अशीच,फिरायला गेले असता व्यायाम मंदिराकडे रांग बघितली तेव्हा कळलं की त्यांचे उन्हाळी शिबिर सुरु होत आहे. या शिबिराची पूर्ण माहिती फळ्यावर लिहिली होती. सोनूचं वय,शिबिराची वेळ,ठिकाण हे सगळं मॅच होणार होतं. फी सुद्धा अगदी माफक होती. अगदी ’युरेका’ म्हणून ओरडावंसं वाटलं. तिथेच पमाला रांगेत उभं राहून फॉर्म घ्यायला लावला. घरी फॉर्म दाखवून लेकीला भरायला दिला. दुसर्‍या दिवशी लगेच अ‍ॅडमिशन घ्यायला गेलो. मारूतीच्या शेपटीसारखी ही भली मोठी रांग. काम शिस्तीत होतं. फॉर्म दोन ठिकाणी चेक करून वेगवेगळ्या टेबलाकडे जात जात एक रिसीट,एक बॅच आणि नियमावली घेऊन त्या व्युहातून अ‍ॅडमिशन घेऊन बाहेर पडलो.त्या नियमावलीत होतं की निळी चड्डी व फक्त बनियन घालून सकाळी ७ वाजता मैदानावर हजर राहावे,पण तो पहिलाच नियम वाचल्यावर सोनूने(वय वर्षे फक्त सहा हं!)आपली नियमावली जाहीर केली. ए आजी,मी नाही हं सुट्टीमध्ये लवकर उठणार,हा कसला फालतूपणा! आणि म्हणे निळी चड्डी आणि बनियन, तुला माहीतीय ना मला फुलपॅंट आणि फुलशर्टशिवाय कुठेही जायला आवडत नाही. तिथे मी मैदानात नुसत्या बनियनवर उघडा खेळणार? इम्पॉसिबल!

मी मनात म्हटलं असू दे, शिबिर सुरु व्हायला अजून थोडे दिवस शिल्लक आहेत,तोपर्यंत त्याच्या मनाची तयारी करू. खरं म्हणजे उठण्याच्या बाबतीत मी स्वत:च सूर्यवंशी असल्याने त्याच्यासाठी मलाही त्याच्या आधी उठायला हवे. त्यासाठी माझ्याच मनाची आधी तयारी करायला हवी ही एक ’अंदरकी बात’ होती. आणि मग गंमतच झाली. एक,मुंजीचं आमंत्रण आलं. ते होतं उरणचं. आग्रहाचं अगदी ३-४ दिवसांचं. राहायलाच या असं अगत्याचं. ते टाळणंच शक्य नव्हतं आणि एक लग्नाचं,पालघरचे,तिथेही जाणं आवश्यकच होतं. त्यानिमित्ताने आऊटिंग होणार होते. सोनू तर मला सोडणारच नव्हता. प्रश्न होता त्या शिबिराचा. मग त्याच्या मम्मी-डॅडीला विचारले,तर त्यात काय,जा जा मुला, लग्नाला जा,शिबिर रद्द! चला, माझा व सोनूचा, दोघांचा जीव एकदमच भांड्यात पडला. सोनूवरचे बनियन घालण्याचे संकट व माझ्यावरचे सकाळी उठण्याचे संकट टळले म्हणून ’दे टाळी’ असं म्हणून एकमेकांना टाळी दिली. बरं झालं कोणाचं लक्ष नव्हतं आमच्याकडे.