समर-व्हेकेशन,सोनू आणि मी! - भाग ३

लग्न-मुंजी आटपल्या. परत फिरायला जाणं सुरु झालं. मी परत एकदा एक मोठ्ठा बॅनर बघितला.तो होता कराटे कोचिंगचा. दे ढिशूम ढिशूम! सोनूला नक्की आवडेल या विचाराने तिकडचा फॉर्म व माहितीपत्रक घेऊन घरी आले. दुसरे दिवशी डान्सचा क्लास जवळच सुरु होत होता असं कळलं,त्याचीही चौकशी केली.
लगेच तत्परता दाखवून लेकीने पण कराटे व डान्सच्या क्लासची अ‍ॅडमिशन घेतली. दोन्ही मिळून बाराशे पंधराशे काहीतरी झाले. कराटेवाल्यांनी फीमध्येच कराटेचा ड्रेसही दिला होता,पण तो होता अगडबंब. मग आमच्या टेलरमास्तर पमाने तो कमी करून सोनू निदान चालताना पडणार नाही एवढा केला.
डान्सवाल्यांनी ऑरेंज टी-शर्ट व ब्लॅक पॅंट किंवा स्लॅक्स आणायला सांगितले. टी-शर्ट मिळाला पण स्लॅक्स काही मिळेना. मग त्याच्या मम्मीने फुलाफुलांची एक स्लॅक्स आणली,पण हा कसला ती घालतोय? ही फुलाफुलांची मुली घालतात,मुलं नाही घालत. त्याच्यापुढे डान्स टीचरनेही हार मानली. नको बाबा घालू,पण तू क्लासला ये. कारण तसा स्टेपस्‌ शिकायला हुशार होता. चांगलं पिकअप करत होता. मग दुकानात ती फुलांची स्लॅक्स परत करून नको असलेले दोन बनियन आणले व दादरभर फिरून एक काळी गुढघ्यापर्यंतची ब्लॅक स्लॅक्स मिळवण्यात विजयश्री मिळवली. एकदाचे डान्स व कराटे क्लासेस सुरु झाले. दोन्हींचे वार वेगवेगळे, ते लक्षात येईना म्हणून त्याचं टाईमटेबल लिहून फ्रीजवर लावले आणि मी हुश्श केले.
दोन दिवसांनी माझ्या अतिउत्साही लेकीने त्याची सकाळ रिकामी असते म्हणून सकाळी स्विमिंग कोर्सला व त्यातही क्रॅश कोर्स फक्त १५ दिवसांचा असतो म्हणे,त्यालाही अ‍ॅडमिशन घेतली आणि त्याची फी हजारभर असते ही माझ्या जनरल नॉलेजमध्ये भर पडली.मला वाटते या तीन क्लासच्या फीमध्ये माझे बिगरी ते बी.ए.पर्यंतचे शिक्षण झाले असेल. आता परत सोनूच्या स्विमिंग ड्रेससाठी फिरणे आले. याही वेळेला सगळीकडे चौकशी केल्यावर त्याच्या मापाची पण थोडी घट्टच अशी पॅंट मिळाली. ती इतकी मापाची होती की कोर्स १६ दिवस असता तर सोळाव्या दिवशी त्याला झाली नसती. सकाळी उठून व त्याला उठवून तयार करून त्याच्या स्विमिंगचे टायमिंग साधण्यासाठी माझे घरातील रनिंग सुरु झाले.पमा त्याला आणायला,सोडायला जाऊ लागली. दुसर्‍या दिवशी माझ्या कपाटातून एक पॉश बॅग तिने काढली,ते पाहून मी म्हणाले,कशाला गं हवीय ती एवढी चांगली बॅग?
असं काय कारता? अहो त्याचा टॉवेल,पाण्याची बॉटल,मला तिथे वेळ घालवायला वाचण्यासाठी पुस्तक वगैरे ठेवायला चांगली बॅग नको का? माहीत नाही तुम्हाला, कसल्या एकेक हायफाय बायका नटून येतात तिकडे! मी नाही हं कापडी पिशवी नेणार!
मनात म्हटलं,हो गं बाई,नशीब, त्या बायकांचे पाहून नवीन ड्रेस नाही मागितलेस, बॅगेवरच भागलं.सोनूच्या डॅडीने गाडीनं सोडलं तरी येतांना गाडी नसे म्हणून टॅक्सीचा खर्च होई,तर कधी श्रमपरिहारार्थ आईस्क्रीम कोन रू.२५चा कमीत कमी हवा असे आणि एवढं करूनही सोनूच्या तक्रारी असतच. कधी सरांच्या,तर कधी कसल्या. स्विमिंग करून पोरगा तीन दिवसात काळा दिसू लागला. माझा एक भाऊ तो(सोनू) छान गोरापान म्हणून सोनूला उकडीचा मोदक म्हणायचा, आता बघितलं तर म्हणेल अरे हा तळलेला मोदक कसा झाला? इतका त्या पाण्याने स्कीनमध्ये फरक झाला आणि रोज येताना वुंडेड सोल्जरसारखं त्याला कुठे तरी लागायचं आणि त्याच्याबरोबर मीही रडवेली व्हायची,पण मुलाला सगळंच आलं पाहिजे असा हल्लीच्या पिढीचा दृढ समज असतो ना ,काय बोलणार?

स्विमिंग करून आला की त्याच्या तक्रारी ऐकून समजूत घालून त्याची आंघोळ व कॉफी द्यायची(कोल्ड कॉफी न दिल्यास बरीस्टामधील शंभर रूपयांची पेनल्टी कोण देईल?) आणि नंतर जेवण व झोप. झोपून उठला की काहीतरी रोज नवा पदार्थ हवा असायचा. तो खाऊन होईपर्यंत संध्याकाळचे सत्र सुरू व्हायचे. मग डान्सचा क्लास, त्याला तोही विशेष आवडला नाही. बकवास,फालतू अशी रोज खिशातून नवनवी विशेषणं काढीत असे,पण जात होता ह्यातच समाधान होते.
डान्स झाला की अर्ध्या तासाने परस्पर कराटेच्या क्लासला जावं लागायचं. तिथे मात्र दोन-तीन मित्रांची गट्टी जमली, आवडलंही.

’कुणा डून सेट मेट दसेर तुकाब पड बहा’ अशा न कळणार्‍या जॅपनीज भाषेत तो जेव्हा कराटेच्या स्टेपस्‌ दाखवू लागला तेव्हा खूप मजा वाटली,पण रागावला की कराटेचा आमच्यावर प्रयोग होईल म्हणून भीती वाटायची.कराटेला सोडायला मी  गेले की क्लबच्या लॉनवर खुर्चीवर संध्याकाळच्या शांत वातावरणात बसायला फार छान वाटायचं. माझ्याही तिथे ओळखी झाल्या,गप्पा होऊ लागल्या. कंटाळा आलाच तर कॉफीपानही होई.रात्री घरी परतायला ९ वाजत असत. त्याच्यापुढे आमच्या आवडत्या सिरियल्स..त्याच, टॉम अ‍ॅंड जेरी, नाही तर पापय द सेलर बघून झालं की दिवस कधी संपला ते कळायचंच नाही.असं करता करता सगळ्या क्लासेसचं सूप वाजलं व समर व्हेकेशन एकदाचं संपलं.

आणि एकदम लक्षात आलं,अरे सोनूला एंगेज ठेवता ठेवता आपण घरातील सगळेच यात कसे छान एंगेज झालो होतो. उन्हाळी शिबिरे हवी की नको हा एक वादाचा किंवा परिसंवादाचा विषय आहे ते सोडून देऊ...पण मुलं चार मुलात मिसळतात,मोकळ्या हवेत खेळतात. एखाद्याला त्याच्या आवडीनिवडीचा धागा मिळतही असेल. काहीतरी नवीन शिकतच असतील,निदान त्या Idiot Box समोर बसून राहत नाही हेही कमी नाही. आपलीही चारचौघांची ओळख होते,विचारांची देवाणघेवाण होते. आजूबाजूला छान गोजिरवाणी मुलेमुली बागडत असतात,खेळत असतात असं आनंदी दृश्य पाहायला घराबाहेर तर पडायला हवं नाही का!
इति समर व्हेकेशन पुराण समाप्त!

लेखिका: जयबाला परूळेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: