राजाभाऊ आज सकाळी लवकर उठले. रविवारचा दिवस आणि राजाभाऊ सकाळी इतक्या लवकर उठलेले पाहून सीमा वहिनी मात्र खरंच आश्चर्यचकित झाल्या. साहजिकच आहे, सकाळी दहा वाजून गेले तरीही अंगावरची चादर ओढून काढेपर्यंत काही महाशय उठत नसंत रविवारी- मग हे आज काय झालं?
त्यांना उठलेले पाहून, हातातला टाइम्स वाचताना पाहून त्यांनी चहा ठेवला गॅसवर. आज काय झालं असेल बरं इतक्या लवकर उठायला? पेपरचं, रवंथ करत चाललेलं वाचन बघून सीमाताईंना संताप आला. आम्ही मेलं, सकाळी उठून इतकं मर मर मरायचं, आणि हे मात्र बस्स.. चहाचा कप आणि पेपर घेऊन बसतील, कमीत कमी तीन तास.स्वतःशी पुटपुटणं सुरू केलं, मी म्हणते, केली थोडी मदत तर काय होईल? पण नाही. आता पेपर ठेवला की लॅपटॉप सुरू करतील, मनातल्या मनात करवादल्या... आणि पेपर ठेवला की कुठले कुठले ब्लॉग वाचत बसतील.
पण आज मात्र राजाभाऊंनी मनावर घेतलं. आपण इतके दिवस ब्लॉग वाचतोय, मग आपला पण एक ब्लॉग का असू नये? आजपर्यंत स्वतःचा ब्लॉग सुरू न करता केवळ इतरांचे ब्लॉग वाचन करतो आपण. स्वतःशीच हसले राजाभाऊ. आणि ब्लॉग सुरू करायचा तर काय आणि कसा करायचा? ह्यावर विचार करू लागले. समोरच पॅड आणि पेन पडला होता. पेन उचलला आणि त्यांनी यादी सुरू केली नवीन ब्लॉग सुरू करण्यासाठी काय करावे लागेल याची!
१) लॅपटॉप
२) बायको! बायको कशाला? तर अधून मधून चहा, भजी वगैरे करून द्यायला! लिहायचं म्हणजे काय चेष्टा आहे का? किती विचार करावा लागतो लिहायला. मग अधून मधून चहाचा कप तर हवाच! आणि सिगारेट्सची दोन पाकिटं!
३)चार पाच इ मेल आयडी. एखादा अतिशहाणा जर ब्लॉगवर आलाच, तर त्याला झापायला म्हणून कमीत कमी चार-पाच निरनिराळ्या इ-मेल आयडी असायलाच हव्या.
४) तीन चार डमी नावाने सुरू केलेले ब्लॉग्ज. ह्या ब्लॉग वर काही लिहिण्याची गरज नाही, हे म्हणजे जर एखाद्याने आपल्याला काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या ब्लॉग वर जाऊन कॉमेंट्स टाकायला हे असे डमी ब्लॉग हवेत.
अहो आजकाल ब्लॉगर्स वर किंवा काही वर्डप्रेस ब्लॉग वर पण लॉग इन केल्याशिवाय कॉमेंट्स टाकता येऊ नये अशीही सोय केलेली असते , तेव्हा हे असे ब्लॉग उपयोगी पडतील.
५)चार पाच मित्र - जे तुम्हाला कोणी अडचणीत पकडले तर मदतीला धावून येतील असे.
६) एक गुरु :- ब्लॉगिंग म्हणजे काय याची ओळख करून देणारा. तसा कांचनचा एक ब्लॉग आहे ’ब्लॉग वाले.’ तो पण गुरु म्हणून चालू शकेल, पण एखादा फिजिकल(???) गुरु असला तर जास्त बरे असे उगीच वाटले राजाभाऊंना.
७) काही खास ब्लॉगच्या लिंक्स माहिती असायला हव्या. म्हणजे तिकडून कॉपी केले की इकडे म्हणजे आपल्या ब्लॉगवर पोस्ट करायचे झाले. एक दोनदा असे केले की ज्याचे ते पोस्ट आहे तो चवताळून येतोच आपल्या ब्लॉगवर आणि कॉमेंट टाकतो. तो आपल्या मित्रांना पण आणतो ब्लॉग वर, सांगायला की हे पाहा या माणसाने माझी पोस्ट चोरली. स्वतः काही लिहिण्यापेक्षा इतरांनी लिहिलेले,तसेच्या तसे इकडे चिकटवले तर जास्त सोपे होऊ शकेल आणि समजतं तरी कोणाला की तुम्ही कॉपी केली आहे म्हणून.
८) सक्सेसफुल ब्लॉग सुरू करण्यासाठी काही तरी कॉंट्रोव्हर्सीयल लिहायचे, की मग त्यावर आपोआपच लोकं कॉमेंट्स टाकतात आणि ब्लॉग ला प्रसिद्धी पण मिळते. कुठलाही वंदनीय नेता ( जो हयात नाही ) त्याच्या बद्दल गरळ ओकायची की झालं. एखाद्या मोठ्या लेखकाच्या नावाने स्वतःच काहीतरी लिहायचे आणि त्याचे दाखले द्यायचे. एवढं केलं की झालोच आपण यशस्वी ब्लॉगर.
९) अग्रिम जामीन! कारण जर समजा काही कारणाने एखाद्याने तुम्हाला नोटीस पाठवली तर मग त्याचे उत्तर देण्यासाठी म्हणून .
१०) एकादा पोलीस अधिकारी मित्र म्हणून- जर कधी आत जावं लागलं ( ऍट्रोसिटीच्या केस मध्ये , तर........असावा हाताशी म्हणून.)
११) प्रस्थापितांच्या विरुद्ध काय वाटेल ते लिहायचे, जागोजागी बामणी कावा, मराठा अस्मिता, बहुजन समाज, असे शब्द पेरायचे. बरेचदा आपल्या मनात जे काही आहे ते लिहायचे, पण लिहिताना हे दुसर्य़ा एका कोणा मोठ्या लेखकांनी , किंवा नेत्याने असे म्हटले आहे म्हणून सांगायचे, म्हणजे कोणी वाकड्यात जायचे धाडस करीत नाही.
१२) सगळ्यात शेवटी एक मस्त पैकी स्कॉचची बाटली.अहो सिलेब्रेशनच्या वेळेस लागेल नां- वेळोवेळी. अशा बर्याच संधी येतील. पन्नासावी पोस्ट, पहिले हजार वाचक, पहिले पाच हजार वाचक, पहिला मासिक वाढदिवस , पहिल्या पन्नास कॉमेंट्स वगैरे वगैरे...
१३) मराठी टायपिंग सॉफ्ट वेअर. जो पर्यंत फ्री वर्शन मिळत नाही, तो पर्यंत कॉपी पेस्ट ब्लॉगिंग करू शकतो आपण, म्हणजे त्याची फारशी काळजी नाही .
१४)शिव्यांचा कोश असलेला जास्त बरा. आपण काही लिहिल्यावर लोकांनी शिव्या दिल्या तर, वर दिलेल्या काही खोट्या आयडी वापरून तुम्ही त्या माणसाला शिव्या देऊन स्वतःचे मन हलके करून घेऊ शकता.
१५) राजकीय नेत्यांवर लिहायचे असेल तर रिव्हॉल्वरचे लायसन्स नक्की घ्यावे लागेल. त्या नेत्याचे खास चमचे तुमचे आयुष्य कठीण करू शकतात. जो पर्यंत रिव्हॉल्व्हर चे लायसन्स मिळत नाही तो पर्यंत एक रामपुरी चाकू.
१६) शिवाजी महाराज हे आपली जहागीर आहेत,आपल्याशिवाय शिवाजी महाराजांवर कोणी प्रेम करूच शकत नाही आणि इतर जातीतले लोकं म्हणजे शिवाजी महाराजांचे दुश्मन होते हे ठासून लिहिले की ब्लॉगला खूप छान हिट्स मिळतील.बर्याच लोकांनी अजमावलेला हातखंडा आहे हा. पण त्यासाठी आधी इतिहासाची म्हणजे श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकं वाचायला विकत घ्यावी लागतील.
१७) जेम्स लेन नावाचा कोणी लेखक होता म्हणे-- त्याचं पुस्तक वाचायला हवं( म्हणजे ब्लॉग वर परीक्षण लिहिता येईल)
राजाभाऊंनी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला, आपल्याकडे काय काय आहे ? काय नाही? ज्या गोष्टी नाहीत, त्या कधी आणि कुठून मिळवायच्या? वगैरे विचार केला, आणि एकदाचा ब्लॉग सुरू केला . त्यांच्या ब्लॉग साठी त्यांनी पहिले पोस्ट पण तयार केले. तेच इथे पोस्ट करतोय मी ( कॉपी पेस्ट करून :) ) एक चांगला हिंदी ब्लॉग आहे, उडनतश्तरी नावाचा त्याच्यावरून बेतलेले पोस्ट आहे हे :) जय ब्लॉगिंग.
लेखक: महेंद्र कुलकर्णी
५ टिप्पण्या:
सगळ्यात शेवटी एक मस्त पैकी स्कॉचची बाटली.अहो सिलेब्रेशनच्या वेळेस लागेल नां- वेळोवेळी. अशा बर्याच संधी येतील. पन्नासावी पोस्ट, पहिले हजार वाचक, पहिले पाच हजार वाचक, पहिला मासिक वाढदिवस , पहिल्या पन्नास कॉमेंट्स वगैरे वगैरे...>>>>
हे भन्नाट होतं.. ;)
हा हा हा ..भन्नाट :)
एक नंबर ..... लय भारी
झकास!!! कसल्या सटासट वाजवल्या आहेत. वाचल्यावर संबधित 'अधिकारी' गाल चोळतील ह्याची खात्री आहे.
हाहा.. भन्नाट
टिप्पणी पोस्ट करा