रूद्राक्षाच्या माळा - भाग ५

श्रो : महाराज काही वेळा आम्ही हे औषध दुपारी प्यायला चालू करतो ते रात्री थांबवतो. याने काही अपाय तर नाही ?

म: आपण येथे आहात यातच याचे उत्तर आहे. नाही का ?
(मंडपात हास्याचे फवारे. कशी जिरवली अशा तर्‍हेचे उद्गार.)

श्रो.: महाराज, जय हो. माझे ध्यान करताना चित्त विचलित होते. मी काय करू ?

म.: बालका, तू ध्यान करताना पिऊ नकोस तर पीत असतानाही ध्यान कर. यातला मूलभूत फरक जाणून घे. यात तुला प्यायची मुभा आहे पण ध्यान करताना विचारशील तर अल्कोपाथीला बंदी आहे. हा सूक्ष्म फरक ज्याच्या लक्षात आला तोच पूर्णत्वाला पोहोचला.

श्रो.: धन्य हो महाराज धन्य हो. आपली शिकवण मी तन मन धन वापरून अंमलात आणीन.

म: ( चुकून बोलून गेले. कारण त्यांनी जीभ चावलेली आमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही ) ते लागेलच !
तेवढ्यात त्या महासभेच्या कोपर्‍यात थोडीशी गडबड उडाली. त्याबरोबर बरेच स्वयंसेवक तिकडे धावले.

म: त्यांना अडवू नका. अडवू नका. अल्कोपाथीसमोर सर्व समान आहेत. एका पातळीवर आहेत. मी त्यांच्यात ते माझ्यात आणि ’कावळा-पांढरा’ सगळ्यांच्यात अशी ही एकात्मता आहे. (हे बोलताना महाराजांच्या डोळ्यात पाणी तरळले.) बोल, बालका बोल !

श्रो: महाराज मी समस्त अखिल भारतीय अल्कोपाथी क्लबतर्फे आपले आभार मानतो. आपल्यामुळेच आमच्या परमपूज्य बापूंचा चष्मा व काठी भारतात परत आली. आम्ही आता आपले आभार मानण्यासाठी येणार्‍या वर्षात आठवड्यात एकदा सर्व प्रमुख शहरात ’बियर मॅरॅथॉन’ आयोजित करायचा संकल्प सोडला आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून याचा स्वीकार करावा.

म: सुंदर ! सुंदर कल्पना. असे झाले तर आम्ही छत्रपतींची तलवारही परत आणू. यासाठी मी आपणास सूचना करतो की ही मॅरॅथॉन आठवड्यात दोनदा करावी……
हे ऐकल्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला तो थांबेचना. समस्त श्रोतृवर्ग बेफाम होऊन नाचू लागले. व त्याच वेळी भगिनींनी प्रार्थना चालू केली. त्याची चाल….. बरोबर… !

इकडे व्यासपीठावर महाराज ज्या आसनात गेले होते त्या आसनातून त्यांना बाहेर यायला जमेना. हाताचे कडबोळे आणि त्यात पायांची पुरचुंडी अशा अवस्थेत ते बराच वेळ उभे होते व शेवटी जमिनीवर कोसळले.

आमचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही जमिनीवर तसे आडवेच झालो होतो. अर्धवट झोपेत आम्ही महाराजांकडे शेवटचे पाहून घेतले, मनोमन त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि एका निर्वात पोकळीत विलीन झालो.”

या वृत्तांतानंतर दुसर्‍या दिवशी आम्हाला बंगळूरूहून बोलावणे आले. सोबत विमानाचे तिकीट व एक भली मोठ्ठी पेटी. त्यात काय होते हे जाणकारांनी ओळखले असेलच. या भेटीदरम्यान आमचा सत्कार हिंदूह्रदसम्राटांच्या हातून करण्यात आला. खूश होऊन त्यांनी विचारले

स्वामींनी आपले बरेच कौतुक केले आहे, बोला काय देऊ आपल्याला?

महाराज, आपल्यासारखी हातात रुद्राक्षांच्या माळा घालण्याची परवानगी. आम्ही हजरजबाबीपणे उत्तर दिले.

बराच वेळ शांततेत गेला. साहेबांच्या मनातली उलघाल व तडफड आम्ही समजत होतो. पण आम्ही त्यांच्याच बाण्याचे, हटलो नाही.

एकदाचे त्यांच्या तोंडून ते अमृत बाहेर पडले -
तथास्तु !

लेखक : जयंत कुलकर्णी




३ टिप्पण्या:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

झकास. तुम्हाला भारतरत्न द्यायला पाहिजे.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

एक सुविचार आठवला: वास्तव हा एक मद्याच्या अभावामुळे निर्माण होणारा भ्रम आहे.

Copyright जयंत कुलकर्णी म्हणाले...

हा हा हाऽऽऽऽऽऽऽ!